गुढी पाडव्या निमित्त भवानी मंडपाला 25 फूटी साखरेची माळ

 गुढी पाडव्या निमित्त भवानी मंडपाला 25 फूटी साखरेची माळ



कोल्हापूर दि.३० सिटी न्यूज नेटवर्क 

 मराठी नववर्षाच्या स्वागताचा पहिला दिवस म्हणजेच गुढी पाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दारोदारी उभारण्यात आलेल्या गुढ्या, रांगोळीची आकर्षक सजावट आणि परिचितांना दिल्या जाणाऱ्या नवनवर्षाच्या शुभेच्छांची दिवसभर रेलचेल पाहायला मिळते. शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्यात येतो. विशेष म्हणजे कोल्हापुरातील माळकर कुटुंबीय दरवर्षी रितीरिवाजाप्रमाणे ऐतिहासिक भवानी मंडपाला साखरेच्या माळेचं तोरण बांधतात. गेल्या चार पिढ्यांपासून भवानी मंडपाला माळकर कुटुंबीयांकडून तोरण बांधण्याची परंपरा सुरू आहे. कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन छत्रपती राजाराम महाराजांना कन्यारत्न झालं, तेव्हा आनंदोत्सव म्हणून रामचंद्र माळकर यांनी विशिष्ट साच्यातील साखरेची माळ बनविली. २५ फुटांची असणारी ही साखरेची माळ त्यावेळी राजवाड्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या भवानी मंडपाला तोरण म्हणून बांधण्यात आली होती. ही परंपरा आजतागायत माळकर कुटुंबियांच्या चौथ्या पिढीकडून अखंडपणे सुरू आहे. आज परंपरेने  सकाळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते भवानी मंडपाला २५ फुटी साखरेची माळ बांधण्यात आली. यावेळी माळकर कुटुंबातील निखील माळकर, सागर माळकर, शंतनू माळकर, माजी नगरसेवक ईश्वर परमार, कमलाकर जगदाळे आदी उपस्थित होते.

Comments