तब्बल साडेसात कोटी रुपये किमतीच्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचे कोल्हापूर विमानतळावर खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते लोकार्पण

 


तब्बल साडेसात कोटी रुपये किमतीच्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचे कोल्हापूर विमानतळावर खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते लोकार्पण



कोल्हापूर, ता. २३ सिटी न्यूज नेटवर्क 

  कोल्हापूर विमानतळावर विविध सेवासुविधा निर्माण करण्याबरोबरच विमानतळ आणि प्रवाशांची सुरक्षा करण्यासाठी विविध उपाययोजना अवलंबल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, विमानतळावर साडेसात कोटी रुपयांचे अग्निशमन वाहन दाखल झाले आहे. दुबईमधून हे अग्निशमन वाहन कोल्हापूर विमानतळावर आणले असून, ६ हजार लिटर पाणी क्षमतेचे वाहन ७० मीटर अंतरापर्यंत पाण्याचा मारा करुन आग विझवू शकते. आज या वाहनाच्या सेवेला खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत सुरवात झाली. यावेळी खासदार महाडिक यांनी वाहनात बसून, अग्निशमनाची प्रात्यक्षिकेही पाहिली.



कोल्हापूर विमानतळ आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दुबईवरुन अत्याधुनिक अग्निशमन वाहन आणण्यात आले आहे. हे वाहन कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले आहे. एअरपोर्ट क्रॅश फायर टेंडर या नव्या वाहनाचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. विमानतळावर अत्याधुनिक अग्निशमन वाहन कार्यरत झाल्यामुळे आगीसारख्या घटनांपासून गतीने संरक्षण मिळेल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. साडेसात कोटी रुपये किमतीच्या या वाहनाची क्षमता ६ हजार लिटर पाणी, ८०० लिटर फोम आणि २०० किलो ड्राय केमिकल पावडर साठवण्याची आहे. आगीची वर्दी मिळताच पहिल्या २५ सेकंदात हे वाहन प्रतितास ८० किलोमीटरचा वेग गाठते आणि ७० मीटर अंतरापर्यंत पाण्याचा मारा करुन, आग विझवू शकते. गेली १० ते १२ वर्ष याबाबत पाठपुरावा सुरु होता. त्याला यश आल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. दरम्यान खासदार महाडिक यांनी या वाहनात बसून त्याची प्रात्यक्षिकेही पाहिली. या वाहनाच्या माध्यमातून विमानतळाला आगीपासून सुरक्षा कवच मिळाले आहे. शुभारंभ प्रसंगी विमानतळ अधिकारी अनिल शिंदे आणि कर्मचारी उपस्थित होते.

Comments