कोल्हापूर शहरात वारंवार उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शिंगणापूर योजनेला अद्ययावत करण्यासाठी निधी द्यावा - आमदार अमल महाडिक यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
शहरातील पाणीपुरवठा नियोजनासंदर्भात लवकरच व्यापक बैठक घेऊ - पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर शहराला अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र सुरुवातीपासूनच या योजनेमध्ये अनेक त्रुटी आढळून येत आहेत. तांत्रिक बिघाड,गळती अशा विविध कारणांमुळे वारंवार पाणीपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे शहरात अनेकदा पाणीटंचाई अनुभवायला मिळते. शहराच्या अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की महापालिकेवर येते. अपुऱ्या पाणी पुरवठ्याविरोधात अनेकदा नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्रही पाहायला मिळत आहे. यावर उपाय म्हणून शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी शिंगणापूर योजना अद्ययावत करण्यासाठी निधी देण्याची मागणी आमदार अमल महाडिक यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
थेट पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वी याच शिंगणापूर योजनेतून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा केला जात होता. सध्या या योजनेमध्ये ७ पंपांद्वारे पाणी उपसा केला जातो. त्यापैकी ३ पंप नुकतेच बदलण्यात आले आहेत. ७१० अश्वशक्तीचे दोन पंप बदलण्यासाठी ४ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी जिल्हा नियोजन समिती मधून तातडीने उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठक घ्यावी आणि तसे निर्देश जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना द्यावेत अशी मागणी आमदार महाडिक यांनी केली आहे.
शिंगणापूर पाणी योजना सक्षम झाल्यास भविष्यात थेट पाईपलाईन योजनेत बिघाड झाला तरीही कोल्हापूर शहरवासीयांना स्वच्छ आणि मुबलक पाणी अखंडितपणे उपलब्ध होईल याकडे आमदार महाडिक यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.
कोल्हापूर वासियांना ऐन उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय म्हणून शिंगणापूर योजनेला बळकटी देण्यासंदर्भात लवकरच बैठक घेण्याची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
एकूणच भविष्यात कोल्हापूर शहरवासीयांना स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी थेट पाईपलाईन योजनेला पर्याय म्हणून शिंगणापूर पाणी योजना पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील अशी आशा आहे.

Comments
Post a Comment