मागील आर्थिक वर्षात ६१ हजार ८९२ नवीन ग्राहकांना वीज जोडणी : कोल्हापूर परिमंडलात वीज ग्राहकांना तात्काळ सेवा
कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क
'सुकर जीवनमान' संकल्पनेनुसार वीजग्राहकांना उत्तम सेवा देण्याबरोबरच नवीन ग्राहकांना तत्काळ वीजजोडणी देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर परिमंडलात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक इतर अशा विविध वर्गवारीतील ६१ हजार ८९२ वीज ग्राहकांना गेल्या आर्थिक वर्षात (सन २०२४-२५) नवीन वीजजोडणी देण्यात आली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ३६ हजार २३ ग्राहकांचा तर सांगली जिल्ह्यातील २५ हजार ८६९ ग्राहकांचा समवेश आहे.
नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने 'इझ ऑफ लिव्हिंग' संकल्पना आणली आहे. वीज ही आज मुलभूत गरज बनलेली असल्याने अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठ्याचा समावेश या संकल्पनेत करण्यात आलेला आहे. त्यानुसार कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिलेले निर्देश आणि वीज नियामक आयोगाने निर्धारीत केलेल्या कृती मानकांनुसार विहित कालावधीत नवीन वीजजोडणी देणे, अखंडित व दर्जेदार वीजपुरवठ्यासह ग्राहकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात येत आहे.
गेल्या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात २६ हजार २५२ घरगुती ग्राहकांना, ७ हजार १२० वाणिज्य ग्राहकांना, १ हजार ४३१ औद्योगिक ग्राहकांना व १ हजार २२० इतर वर्गवारीतील ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महावितरणच्या सहा विभागांपैकी कोल्हापूर ग्रामीण-०२ विभागात सर्वाधिक ८ हजार ९०२ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.
सांगली जिल्ह्यात १९ हजार ७४८ घरगुती ग्राहकांना, ४ हजार ८१३ वाणिज्य ग्राहकांना, ५६४ औद्योगिक ग्राहकांना व ७४४ इतर वर्गवारीतील ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील महावितरणच्या पाच विभागांपैकी सांगली शहर विभागात सर्वाधिक ६ हजार ७१६ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.
आज ग्राहकांना घरी बसल्या, संकेतस्थळ व मोबाईल अँपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने वीज जोडणीचा अर्ज सादर करता येतो. त्यामुळे ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा असे आवाहन कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले आहे.
सध्या, महावितरण ‘कृती मानके’नुसार जिथे वीज यंत्रणा नव्याने उभी करण्याची आवश्यकता नाही अशा शहरी भागात सात दिवसांत तर ग्रामीण भागात पंधरा दिवसांच्या आत वीज जोडणी देण्यात येते. ग्राहकांना नवीन जोडणी बाबत अधिक माहिती हवी असल्यास ते नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधू शकतात.
.jpeg)
Comments
Post a Comment