व्यवसाय परवाना नूतनीकरण फी दरवाढ मागे ने घेतल्यास ३० रोजी महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सभेत निर्धार
कोल्हापूर दि. २८ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर महागरपालिका परवाना विभागाने व्यवसाय परवाना फी मध्ये केलेली दरवाढ मागे न घेतल्यास ३० एप्रिल रोजी महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या आजच्या सभेत घेण्यात आला.
सुरवातीस अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, सन २०२५-२०२६ सालासाठी परवाना विभागाने केलेली दरवाढ अन्यायकारक असून याबाबत दि. ३० मार्च रोजी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन देऊन परवाना फी दरवाढ मागे घेण्यासाठी निवेदन सादर केले होते. तसेच ३ एप्रिल रोजी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील, परवाना अधिक्षक अशोक यादव यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्या बैठकीत सदर परवाना फी दरवाढ मागे घ्या अन्यथा एकही परवाना धारक आपला परवाना नूतनीकरण करणार नसल्याचा इशारा देण्यात आला. त्यावेळी रोकडे यांनी परवाना फी दरवाढ मागे घेणेबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन चेंबरच्या शिष्टमंडळाला दिले.
परंतु, महापालिकेने आजतागायात यावर कोणताच निर्णय न दिल्याने आज अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांची भेट घेऊन परवाना नूतनीकरण दरवाढ मागे घेणे व नूतनीकरणास मुदतवाढ देण्याबाबत विचारले असता त्यांनी उद्या महापालिकेच्या उपसमितीची बैठक असून त्या बैठकीत यावर निर्णय घेऊ असे सांगितले. उपसमितीच्या बैठकीत परवाना नूतनीकरणास मुदतवाढ न दिल्यास आंदोलन छेडावे लागेल असे त्यांनी सांगितले.
उपाध्यक्ष धनंजय दुग्गे यांनी व्यापाऱ्यांचा परवाना फी व अग्निशमन कर बाबत गेल्या ७ वर्षांपासून लढा सुरु असून व्यापाऱ्यांनी आपली एकजूट कायम राखावी असे सांगत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व्यापाऱ्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहिले असून परवाना नूतनीकरण फी दरवाढ मागे घेण्यास महानगरपालिका प्रशासनास भाग पाडू असे सांगितले.
मानद सचिव अजित कोठारी म्हणाले, परवाना नूतनीकरण फी दरवाढ मागे घेणेबाबत व परवाना नूतनीकरणास मुदतवाढ देणेबाबत महानगरपालिकेस दि. २२ एप्रिल रोजी पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी परवाना नूतनीकरणास मुदतवाढ देण्याचे तोंडी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. आठ दिवस उलटूनही परवाना नूतनीकरणाबाबत लेखी आश्वासन न दिल्याने महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करावे लागेल असे सांगितले.
यावेळी टिंबर व्यापारी संघाचे सचिव लक्ष्मण पटेल, स्टेशनरी कटलरी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर आगरवाल, हॉटेल मालक संघाचे सचिन शानबाग, केमिस्ट असोसिएशनचे दाजिबा पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
शेवटी उपसमितीच्या उद्याच्या बैठकीत परवाना नूतनीकरण फी दरवाढ मागे न घेतल्यास व नूतनीकरणास मुदतवाढ न दिल्यास ३० रोजी महानगरपालिकेच्या मुख्य गेट समोर ठिय्या आंदोलन पुकारण्याचा निर्णय सभेत एकमताने घेण्यात आला.
यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, मानद सचिव वैभव सावर्डेकर, खजिनदार राहुल नष्टे, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर, कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील, रेडिमेड गारमेंट डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित मेहता, रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशनचे अनिल धडाम, नारळ व्यापारी संघाचे अविनाश नासिपुडे, प्लायवूड डिलर्स असोसिएशनचे विनोद पटेल व विविध संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
मानद सचिव वैभव सावर्डेकर यांनी आभार मानले.

Comments
Post a Comment