शक्तीपीठ महामार्गावरून आमदार सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी, शक्तीपीठ महामार्गावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडी म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. मंत्री हसन मुश्रीफ आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मंत्रिमंडळातील भूमिकेवरही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी साशंकता व्यक्त केली. कॅबिनेट बैठकीत त्यांनी विरोध दर्शवला की नाराजी दर्शवली याबाबत आम्हाला माहिती नाही. मात्र, त्यांची भूमिका स्पष्ट होण गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीमध्ये दोन्ही पक्षांची हतबलता असल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावला. राज्य सरकार कर्जाच्या खाईत आहे. साडेनऊ लाख कोटीचे कर्ज राज्यावर आहे. त्यातच आता शक्तीपीठ महामार्गासाठी 12 हजार कोटीच कर्ज राज्य सरकार घेणार आहे. जिल्ह्याच्या नियोजन समिती करता किती निधी येत आहे, हे सर्वसामान्य जनता पाहत आहे. राज्य सरकारचा कॉन्ट्रॅक्टर धार्जीण कारभार सुरू असून, त्यासाठीच हा महामार्ग लादला जात आहे. मात्र त्याला आमचा विरोधच असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार निधी देत नाहीत असा नाराजीचा सूर लावलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या खात्याकडे मोठा निधी आहे, त्यावर लक्ष ठेवा. तो निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या असा आदेश त्यांच्या मंत्र्यांना दिल्याची माहिती आहे. यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुती आघाडीचे सरकार हे नॅचरल अलायंस नाही.. तर हे सरकार आऊट ऑफ कंपल्शन झालेले अलायंस असल्याची टीका केली. तर सहकारी साखर उद्योगाला राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या एनसीडीसी माध्यमातून, जे पैसे दिले जातात. त्याचे दायित्व कुणाला आहे की नाही याचा विचार एकदा राज्य सरकारने केला पाहिजे. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Comments
Post a Comment