शासकीय शाळांच्या गुणवत्तेतील सुधार अभिमानास्पद : खा.धनंजय महाडिक

 शासकीय शाळांच्या गुणवत्तेतील सुधार अभिमानास्पद : खा.धनंजय महाडिक



कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क 

 "खाजगी खर्चिक शाळांमध्ये मिळणारे शिक्षण आणि शासकीय शाळांमधून मिळणारे शिक्षण हे सारखेच असते, हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या खूप शाळांनी दाखवून दिले. शाळांच्या गुणवत्तेतील ही सुधारणा जागृत लोक प्रतिनिधी आणि शिक्षकांच्यामुळेच शक्य झाली." असे कौतुकोद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले. महानगरपालिकेच्या राजे संभाजी विद्यालयातील शैक्षणिक साहित्य वितरण प्रसंगी ते बोलत होते. 



श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्री पूजक मंडळ आणि समिधा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गेली १३ वर्षे समाजातील गरजू विद्यार्थ्यांना भरलेले दप्तर वितरीत करण्यात येते. आज महानगरपालिकेच्या राजे संभाजी विद्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला. स्थानिक माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील यांच्या प्रयत्नाने या शाळेचे पूर्ण रूप बदलले आहे. दोन खोल्यात आणि अत्यल्प पटाची ही शाळा आज चांगली इमारत आणि वाढलेल्या पटसंख्येमुळे परिसरात अत्यंत चांगली शाळा म्हणून ओळखली जात आहे. महानगरपालिकेच्या सातत्याने गुणवत्ता यादीत असणाऱ्या शाळांमध्ये या शाळेचा समावेश झाला आहे. 



श्री पूजक मंडळ आणि समिधा प्रतिष्ठानचा निरंतर चाललेला उपक्रम समजल्यानंतर या शाळेच्या वतीने शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी भरलेल्या दप्तरांची मागणी केली गेली. त्यानुसार आज दप्तर वितरणाचा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी खा. धनंजय महाडिक होते तर रा.स्व.संघाचे प्रांत कार्यकारणी सदस्य सीए मुकुंद भावे हे प्रमुख अतिथी होते. महानगरपालिकेचे उपायुक्त आणि शिक्षण मंडळाचे प्रभारी कपिल जगताप, श्री पूजक मंडळाचे सचिव माधव मुनिश्वर, समिधा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 

सुरुवातिला शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक संभाजी चौगुले यांनी शाळेच्या प्रगतीची माहिती दिली. त्यानंतर अजित ठाणेकर यांनी विद्यार्थी आणि पालकांशी मनमोकळा संवाद साधला. पिढ्यानपिढ्या सेवा करणाऱ्या श्री पूजकांना जगदंबेच्या सेवेचा मिळणारा प्रसाद हा दप्तर स्वरूपात गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आणि समाज ऋणातून उतराई होण्याचा हा उपक्रम आहे असे त्यांनी नमूद केले. सर्व विद्यार्थ्यांना हा प्रसाद त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात कायमच सहाय्यभूत ठरेल असे ते म्हणाले. पर्यावरण संरक्षणात सहभाग म्हणून शालेय साहित्या सोबतच एक कापडी पिशवी विद्यार्थ्यांच्या कुटुंबासाठी देण्यात आली. यापुढे विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबाने प्लास्टिकचा वापर टाळावा आवाहन करण्यात आले. 

खा. महाडिक यांनी आपल्या उद्बोधनामध्ये शाळेची इमारत अतिशय चांगली झाली असून ती अक्षरशः चित्रपटातील शाळेप्रमाणे भासते असे कौतुक केले. त्याचबरोबर शिक्षकांच्या मेहनतीने तयार होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पुढील इयत्तांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन केले. उपयुक्त कपिल जगताप यांनी शाळेच्या पुढील वर्गांच्या प्रस्तावासाठी तातडीने मान्यता देण्याचे आश्वासन दिले. 

त्यानंतर शाळेत नव्याने दाखल झालेली विद्यार्थिनी आणि गिर्यारोहणामध्ये अनेक जागतिक विक्रम करणाऱ्या सई घाडगे चा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना भरलेले दप्तर देण्यात आले. 


यावेळी पर्यवेक्षक विजय माळी ,लायन्स क्लब कोल्हापूर चे अध्यक्ष  अविनाश पेंडूरकर, राजेश कोगनूळकर,अजित साळोखे,विनय खोपडे, अभय तेंडुलकर, सुधिर राणे, संग्राम पाटील, निलेश निकम, शांतीकुमार शेटे, मिथुन मगदूम, संजय खिस्ते, प्रमोद कांबले, प्रशांत हुल्ले. सौ. कविता वासुदेव, सौ. अश्विनी गुरव, सौ. शिल्पा गंभीरे व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments