गेल्या १५ वर्षात भागीरथी महिला संस्थेने शेकडो उपक्रम राबवत, हजारो महिलांना स्वावलंबी, सक्षम, उद्योजिका आणि ज्ञानसमृध्द बनवले : अरुंधती महाडिक
गेल्या १५ वर्षात भागीरथी महिला संस्थेने शेकडो उपक्रम राबवत, हजारो महिलांना स्वावलंबी, सक्षम, उद्योजिका आणि ज्ञानसमृध्द बनवले : अरुंधती महाडिक
कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क
महिलांच्या अंगी उपजत उद्योग व्यवसायाची क्षमता असते. अशा महिलांना योग्य मार्गदर्शन मिळाले, प्रशिक्षण मिळाले, तर या महिला कुटुंबाबरोबरच जिल्ह्याचे अर्थकारण बदलू शकतात. हा विश्वास मनामध्ये घेऊन, कोल्हापुरात २३ जुलै २००९ रोजी भागीरथी महिला संस्थेची स्थापना झाली. खासदार धनंजय महाडिक यांच्या खांद्याला खांदा लाऊन, सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या सौ. अरुंधती महाडिक यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भागीरथी महिला संस्थेने गावागावात बचत गटाच्या महिलांना एकत्र केले आणि महिला सबलीकरणाच्या प्रवासाला सुरवात झाली. गेल्या १५ वर्षात भागीरथी महिला संस्थेने शेकडो उपक्रम राबवत, हजारो महिलांना स्वावलंबी, सक्षम, उद्योजिका आणि ज्ञानसमृध्द बनवले आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना त्यांनी भागीरथी महिला संस्थेच्या १५ वर्षाच्या प्रवासाचा आढावा घेतला. महिलांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे, या हेतूने भागीरथी महिला संस्थेच्यावतीने गेल्या १५ वर्षात शेकडो प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली. जवळपास ४ लाख महिलांना मोफत प्रशिक्षण देण्याबरोबरच मार्केटिंगची देखील सोय उपलब्ध करुन दिली. त्यासाठी भिमा कृषी प्रदर्शन मध्ये मोफत स्टॉल, वेगवेगळ्या संस्थाच्या प्रदर्शनात आणि बिझनेस एक्स्पोमध्ये सहभागी करून महिलांना अर्थाजर्नाचा राजमार्ग खुला करण्यात आला.
तसेच संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यात भागीरथी ग्रंथालयाच्या २६ शाखा उघडून वाचन चळवळ गतीमान केली. तसेच काही वाचनालयांना पुस्तकांचे वाटप देखील करण्यात आले. या कार्याची दखल घेत, भागीरथी ग्रंथालयाला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड हा सन्मान प्राप्त झाला.
तर महिलांच्या मनोरंजनासाठी होम मिनिस्टर, फॅशन शो, डान्स कॉम्पीटीशन, मिस ऍण्ड मिसेस भागीरथी, महिलांसाठी रांगोळी, मेहंदी, पाककृती, पुष्परचना सजावट स्पर्धा आणि चैत्रगौरी, हळदी-कुंकूसह विविध उपक्रम गेल्या १५ वर्षापासून सातत्याने होत आहेत. या सांस्कृतिक उपक्रमांमध्ये ६० हजार महिला सहभागी झाल्या. याशिवाय, महिलांसाठी खास रंगपंचमीचे आयोजनदेखील करण्यात आले. ज्यामध्ये १ हजार महिलांनी सहभाग घेतला.
तसेच आपल्या पारंपारिक लोककलांची जपणूक करण्यासाठी, भागीरथी महिला संस्थेतर्फे गेली १५ वर्षे भव्य प्रमाणात झिम्मा फुगडी स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले जाते. ही स्पर्धा राज्यस्तरावर पोचली असून, हजारो रूपयांची बक्षिसे आणि मराठी- हिंदी चित्रपटातील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती तसेच त्यांच्या नव्या चित्रपट किंवा टिव्ही मालिकांचे प्रमोशन या मंचावरून करण्यात आले आहे. त्यामुळे ही स्पर्धा पश्चिम महाराष्ट्राच्या पटलावर सुपरहिट झाली आहे. त्यामध्ये १ लाख २५ हजार महिला सहभागी झाल्या. या स्पर्धेत १२ वर्षाच्या मुलीपासून ते ८६ वर्षाच्या आजीपर्यंत सर्वांचा उत्साही आणि उत्स्फुर्त सहभाग असतो.
तसेच महिलांसाठी धार्मिकदृष्ट्या महत्वाचा असलेला कुंकुमार्चनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामध्ये १५०० महिला उपस्थित होत्या.
या विविध कामामुळे भागीरथी संस्थेला जिल्हा आणि राज्य स्तरावरील १२ पुरस्कार मिळाले आहेत.
१५ वर्षांचा टप्पा पूर्ण करताना भागीरथी संस्थेने कार्यविस्तार आणि संस्था विस्तार केला आहे. त्याद्वारे भागीरथी युवती मंच, भागीरथी वाचनालय, भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था अशा नव्या संस्था उदयाला येवून, उत्तम कारभार करत आहेत. भागीरथी युवती मंचद्वारे स्वसंरक्षण, आत्मनिर्भरता, कला-क्रीडा गुणांचा विकास, आरोग्य संवर्धन आणि सामाजिक जाणीवेबाबत प्रशिक्षण आणि जनजागृती केली जात आहे. वाचनालयाद्वारे महिलांच्या वाचन चळवळीला गती देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेने जिल्हयातील अनेक गरजू कुटूंबांना अर्थ सहाय्य करून, त्यांना व्यापार, उद्योग आणि व्यवसायासाठी पाठबळ दिले आहे. परिणामी जिल्हयातील असंख्य महिला आज विविध उद्योग - व्यवसाय यशस्वीरित्या चालवत आहेत. तर अनेक महिलांनी आपापल्या परिसरात छोट्यामोठ्या संस्था काढून त्या उत्तमरित्या चालवल्या आहेत. त्या महिलांनी भागीरथी महिला संस्थेपासूनच प्रेरणा घेतली आहे. तर भागीरथी महिला संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या अनेक महिला आता स्वत: प्रशिक्षीका बनून इतर महिलांना उद्योग व्यवसायाबाबत मार्गदर्शन करत आहेत. तर अनेक महिलांनी आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास करत समाजकारण आणि राजकारणामध्ये प्रवेश केला आहे. विविध पक्षांच्या पदाधिकारी म्हणून त्या कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून शासकीय अनुदानावर माल वाहतूक करणारी चारचाकी वाहनं आणि व्हॅन्स ग्राहकांना देण्यात आल्या. त्यातून अनेक सभासदांनी भाजी विक्री, फुड व्हॅन, फळ वाहतूक यासह अन्य वाहतूक करत आर्थिक उन्नतीचा मार्ग अवलंबलाय. खासदार धनंजय महाडिक यांचे या कर्ज योजनेसाठी भागीरथी पतसंस्थेला महत्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले आहे.
भागीरथी महिला संस्थेच्या स्थापनेपासून आजतागायत सर्व वाटचालीमध्ये आणि उपक्रमांना खासदार धनंजय महाडिक यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले आहे. वेळोवेळी विविध कार्यक्रमांसाठी मार्गदर्शन आणि आर्थिक मदतही करून, त्यांनी भागीरथी संस्थेला अधिक उंचीवर नेण्याचं काम केलंय. भविष्यात खासदार महाडिक यांच्या पाठबळावर आणि मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरू राहणार आहे.
आता त्यापुढे एक पाऊल टाकून भागीरथी संस्थेने स्वतःची वेबसाईट, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम आणि युटयूब चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सोशल मीडियाद्वारे महिलांचे प्रबोधन, त्यांचे सक्षमीकरण आणि जगभर महिलांनी केलेल्या विविध क्षेत्रातील यशस्वी कामगिरीची माहिती महिलांपर्यंत पोचवण्याचा संस्थेचा मानस आहे. तसेच या वर्षभरात महिलांसाठी आरोग्य विषयक, बौध्दीक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक आणि सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. जिल्हयातील महिलांनी व्यवसाय विषयक मार्गदर्शनासाठी रवी पाटील ९६ ७३ ८१ ९२ ९२ किंवा भागीरथी पतसंस्थेच्या सुप्रिया चौगले यांच्या ८४० ९९ ७५० ५० या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन सौ. अरूंधती महाडिक यांनी केले. पत्रकार परिषदेला सौ. वैष्णवी महाडिक, सौ. अंजली महाडिक, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, शरयू भोसले उपस्थित होत्या.


Comments
Post a Comment