डी.के.ए.एस.सी.कॉलेजमध्ये एन.एस.एस.विभागाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न

 डी.के.ए.एस.सी.कॉलेजमध्ये एन.एस.एस.विभागाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न.



इचलकरंजी २६ सिटी न्यूज नेटवर्क 

 डी.के.ए.एस.सी. कॉलेज, इचलकरंजी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. प्रमोद मिराशी यांनी “पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे जीवनकार्य व शासकीय योजना” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.


आपल्या प्रभावी व्याख्यानात त्यांनी उपाध्यायांच्या संघर्षमय बालपणापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीपर्यंतचा आढावा घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील प्रचारक म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले तसेच भारतीय जनसंघाच्या घडणीत दिलेले योगदानही स्पष्ट केले. विशेषत: त्यांनी मांडलेल्या “एकात्म मानववाद” या तत्त्वज्ञानाचे स्पष्टीकरण करताना व्यक्ती व समाजाचा संतुलित विकास, अंत्योदयाची संकल्पना आणि गरीब व वंचित घटकांच्या उन्नतीचे महत्त्व ठळकपणे सांगितले.


श्री. मिराशी यांनी अंत्योदय अन्न योजना, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, ग्रामीण कौशल्य योजना, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान आदी योजनांचा सविस्तर आढावा घेतला आणि या योजनांमुळे सामान्य नागरिकांना झालेल्या फायद्यांची उदाहरणे दिली. आजच्या काळातील आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया, जन-धन योजना, उज्ज्वला योजना यांसारख्या आधुनिक उपक्रमांमध्ये उपाध्यायांच्या विचारांचा ठसा स्पष्टपणे दिसतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. “गरीबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणे हाच खरा विकास” हा त्यांचा संदेश आजच्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी सांगितले.


कार्यक्रमाचे आयोजन  डॉ. सुनिल भोसले, डॉ.अजिंक्य पत्रावळे कार्यक्रम अधिकारी (रा.से.यो.) यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. निलेश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अजिंक्य पत्रावळे, कार्यक्रम अधिकारी यांनी मानले.  या व्याख्यानासाठी प्रा.पूजा पारिशवाड , डॉ.सारीक पाटील, प्रा.संदीप पाटील रा.से.यो.सदस्य व सर्व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मा. प्राचार्य प्रो.डॉ.एस.के.खाडे याचे प्रेरणा व मार्गदर्शन लाभले.


या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या राष्ट्रनिष्ठ विचारांची, भारतीय संस्कृतीशी जोडलेल्या विकासदृष्टीची आणि अंत्योदयाच्या शाश्वत तत्त्वज्ञानाची सखोल ओळख झाली.

Comments