शहीद'च्या विद्यार्थिनी जगभरात कर्तृत्ववान ठरतील : उत्तम फराकटे

 शहीद'च्या विद्यार्थिनी जगभरात कर्तृत्ववान ठरतील : उत्तम फराकटे



कोल्हापूर (तिटवे) २८ सिटी न्यूज नेटवर्क 

शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी या जगाशी भिडणाऱ्या, आत्मविश्वासू आणि कर्तृत्ववान आहेत. त्यांच्या जिद्दी, मेहनती आणि कलागुणांमुळे  नवी दिशा मिळत आहे, असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध उद्योजक आणि लेखक उत्तम फराकटे यांनी काढले. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आयोजित युथ फेस्टिवलमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थिनींच्या सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 


         संस्थेचे मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील यांनी  नमूद केले की, शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी केवळ स्थानिक नव्हे तर जागतिक पातळीवर आपले अस्तित्व निर्माण करावे. त्यांच्या कलागुणांनी आणि जिद्दीने महाविद्यालयाचे नाव अभिमानाने उजळवावे. प्रत्येक विद्यार्थिनीने आपल्यातील कलेला ओळखून ती जगापर्यंत पोहोचवावी, हेच खरे शिक्षणाचे यश असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, कॉलेज जीवन हा केवळ अभ्यासाचा काळ नसून, तो स्वतःला शोधण्याचा आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रवास आहे. 



एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आयोजित प्रादेशिक युवा महोत्सवात शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी 26 हून अधिक कलाप्रकारांमध्ये भरघोस यश संपादन करत आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला. या विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. त्याचबरोबर मध्यवर्ती युवा महोत्सवातही 15 हून अधिक कलाप्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून विद्यार्थिनींनी आपले वर्चस्व सिद्ध केले.


प्रादेशिक युवा महोत्सवात लिटरेचर, डान्स आणि थिएटर इव्हेंट्समध्ये जनरल चॅम्पियनशिप मिळवत शहीद महाविद्यालयाने आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. तर मध्यवर्ती युवा महोत्सवातील लिटरेचर इव्हेंटमध्येही जनरल चॅम्पियनशिप मिळवून विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचा लौकिक आणखी वाढवला. यावेळी एस.एन.डी.टी. आयोजित क्रीडा महोत्सवात खो-खो या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थिनींचाही विशेष सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केले, तर समन्वयक म्हणून प्रा. दिग्विजय कुंभार यांनी प्रभावी भूमिका पार पाडली. सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. शुभांगी भारमल यांनी केले. यावेळी सूर्यकांत जांभळे, उपप्राचार्य सागर शेटगे, प्रा. विशालसिंह कांबळे, प्रा. सिद्धता गौड, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Comments