सरकारी पेटंट अहवालात जिओ आघाडीवर, 1,037 आंतरराष्ट्रीय पेटंट्स दाखल

 सरकारी पेटंट अहवालात जिओ आघाडीवर, 1,037 आंतरराष्ट्रीय पेटंट्स दाखल




• जिओ प्लॅटफॉर्म्स ठरली देशातील सर्वात मोठी जागतिक पेटंट फाइलर कंपनी

• 5G–6G ते AI पर्यंत, ‘डीप-टेक इंडिया’ची पायाभरणी अधिक मजबूत

• CII कडूनही जिओचा भारतातील अव्वल इनोव्हेटर्समध्ये समावेश

मुंबई १८ सिटी न्यूज नेटवर्क 

भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाअंतर्गत असलेल्या Controller General of Patents, Designs & Trade Marks यांच्या 2024-25 च्या वार्षिक अहवालात जिओ प्लॅटफॉर्म्सला भारतातील सर्वात मोठी जागतिक पेटंट फाइलर कंपनी म्हणून घोषित करण्यात आले आहे.


या वार्षिक अहवालानुसार, जिओ प्लॅटफॉर्म्सने एका वर्षात तब्बल 1,037 आंतरराष्ट्रीय पेटंट्स दाखल केली आहेत. ही संख्या क्रमवारीत दुसऱ्या ते दहाव्या क्रमांकावर असलेल्या सर्व भारतीय कंपन्या व संस्थांनी मिळून दाखल केलेल्या पेटंट्सच्या एकूण संख्येपेक्षा दुप्पटपेक्षाही अधिक आहे. TVS मोटर (238), CSIR (70), IIT मद्रास (44) आणि ओला इलेक्ट्रिक (31) यांसारख्या कंपन्या या शर्यतीत खूप मागे असल्याचे दिसून येते.


देशांतर्गत पेटंट्सची भर घातल्यास, 2024-25 या आर्थिक वर्षात जिओने एकूण 1,654 पेटंट अर्ज दाखल केले आहेत. 31 मार्च 2025 पर्यंत कंपनीकडे 485 मंजूर पेटंट्स होती, ज्यातील मोठा वाटा 5G, 6G आणि नेटवर्क तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. या आकडेवारीवरून जिओ आता केवळ एक टेलिकॉम ऑपरेटर न राहता, भारतातील आघाडीच्या डीप-टेक कंपन्यांपैकी एक म्हणून आपली ठोस ओळख निर्माण करत असल्याचे स्पष्ट होते.


सरकारी आकडेवारीसोबतच उद्योग क्षेत्रानेही जिओला एक मजबूत जागतिक IP प्लेअर म्हणून मान्यता दिली आहे. अलीकडेच CII इंडस्ट्रियल इनोव्हेशन अवॉर्ड्स 2025 मध्ये जिओ प्लॅटफॉर्म्सचा भारतातील टॉप-20 नाविन्यपूर्ण कंपन्यांमध्ये समावेश करण्यात आला. तसेच Large ICT कॅटेगरीमध्ये जिओला ‘बेस्ट पेटंट पोर्टफोलिओ’साठी रनर-अप पुरस्कारही मिळाला आहे.


पेटंट फाइलिंगमागे भक्कम संशोधन व विकास (R&D) गुंतवणूक हेही एक महत्त्वाचे कारण आहे. FY25 मध्ये रिलायन्सने R&D साठी 4,185 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला असून, हा खर्च मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 15 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या तीन वर्षांत कंपनीचा वार्षिक R&D खर्च 1,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढलेला आहे.

Comments