प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकरण योजनेबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेचे वेधले लक्ष
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकरण योजनेबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेचे वेधले लक्ष
लघु उद्योजक, शेतकरी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना जेम पोर्टलवर स्थान मिळणार
नवी दिल्ली १३ सिटी न्यूज नेटवर्क
नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक विविध विषयांवरील चर्चेत सहभागी होत आहेत. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकरण योजनेबाबत नुकतीच संसदेत चर्चा झाली. त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी काही महत्वाच्या मुद्दयांकडे लक्ष वेधले. सुमारे १० हजार कोटी रुपयांची तरतुद असलेल्या या योजनेच्या प्रगती आणि विस्तारीकरणासाठी खासदार महाडिक यांनी काही प्रश्न उपस्थित केले. लघु उद्योजक, शेतकरी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे.
नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात नुकतीच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकरण योजनेच्या प्रगतीबद्दल चर्चा झाली. खासदार धनंजय महाडिक यांनी या चर्चेत सहभागी होत, या योजनेचे महत्व स्पष्ट केले. खासदार महाडिक यांनी कोरोना काळातील उद्योजकांच्या अडचणींचा उल्लेख करत, लॉकडाऊनच्या काळात अनेक उद्योग बंद पडले आणि आर्थिक नुकसान झाल्याचे नमुद केले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियान आणि त्याअंतर्गत पीएम एफएमई योजनेची घोषणा केली.
त्यासाठी प्रारंभी १० हजार कोटींची तरतुद करण्यात आली. त्यातून महाराष्ट्रात २६ हजार १७२ उद्योजकांना ६४६ कोटी रुपयांची मदत मिळाल्याचे खासदार महाडिक यांनी सभागृहात सांगितले. अन्न प्रक्रिया, फळ प्रक्रिया, लोणची-पापड उत्पादने, मध, डेअरी आणि बेकरी अशा उद्योगांना या योजनेतून प्रोत्साहन मिळाल्याचे खासदार महाडिक यांनी नमुद केले. मात्र या योजनेतील लाभार्थ्यांना ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि राष्ट्रीय मार्केटींग चॅनेलशी जोडण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, जेणेकरून या उद्योजकांच्या व्यवसायात वाढ होईल, असा प्रश्न उपस्थित केला. त्याला या विभागाचे राज्यमंत्री नामदार रवनित सिंह यांनी उत्तर दिले.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकरण योजना, लहान उद्योजक, शेतकरी आणि ग्रामीण भागातील महिला उद्योजकांसाठी महत्वाची असून, अशा उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक पावले उचलत असल्याचे नामदार रवनित सिंह यांनी सांगितले. त्यासाठी केंद्र सरकारने उत्पादन आधारीत प्रोत्साहन योजना आणि प्रधानमंत्री किसान संपदा योजना आणली आहे. त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतुद केली असून, सरकारने जेम पोर्टलसोबत सामंजस्य करार केला आहे. या योजनेतील लाभार्थी आता थेट जेम पोर्टलवर आपली उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करू शकतात, असे नामदार रवनित सिंह यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनांच्या यशस्वीतेबद्दल खासदार महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नामदार रवनित सिंह यांचे आभार मानले.

.jpg)
.jpg)
Comments
Post a Comment