प्रशासनाच्या गलथानपणामुळे हजारो लिटर पाणी वाया; कोल्हापूरकर पाण्याविना, शेतजमीन पाण्याखाली
कोल्हापूर २० सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर शहरात काही भागात काही कारणास्तव पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र, यामागचे कारण प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर येथील पाण्याच्या टाकीच्या पश्चिम बाजूची टाकी ओव्हरफ्लो झाल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. हे पाणी थेट चिंतामणी पार्क, शिक्षक कॉलनी, शिवशंभो कॉलनी येथील घरात गेले असून आजूबाजूच्या शेतात वाहून गेले. अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे परिसरातील शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले असून पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
या घटनेमुळे एकीकडे शेतकरी आर्थिक नुकसानीने हवालदिल झाले असताना, दुसरीकडे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी साठवणूक आणि वितरण यंत्रणेतील निष्काळजीपणा, देखरेखीचा अभाव आणि वेळेवर उपाययोजना न केल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप होत आहे.
नागरिकांनी प्रशासनाच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “ही काही पहिलीच वेळ नाही. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडतात, पण प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाहीत,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Comments
Post a Comment