मेन राजाराम मध्ये इ.12वी च्या विद्यार्थ्यांचे आनंददायी वातावरणात स्वागत
कोल्हापूर १० सिटी न्यूज नेटवर्क
'बोर्ड परीक्षा' हा शब्द उच्चारला की, विद्यार्थ्यांच्या काळजात कालवाकालव व भीती निर्माण होते.त्यात ज्या काॅलेजमध्ये आपण ज्ञानाचे धडे घेतले.त्या काॅलेजपेक्षा दुसऱ्या काॅलेजमध्ये परीक्षेचे नंबर असल्याने मुलांना ताणतणाव, टेन्शन व चिंता वाढते.
तर अशा भयग्रस्त, तणावग्रस्त वातावरणातून भयमुक्त, ताणतणाविरहित आनंदी वातावरणात दुसऱ्या काॅलेजमध्ये परीक्षेला सामोरे जाता येईल, यासाठी जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित,मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर या काॅलेजमध्ये इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय परिसर सुशोभित, रांगोळी,पानांफुलांचा सडा घालून, परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचे मन आनंदी, प्रसन्न व्हावे या हेतूने मेन राजाराम काॅलेजमार्फत आगळ्यावेगळ्या पद्धतीने या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
या काॅलेजमध्ये इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेस एकूण २५०विद्यार्थी बसले असून या परीक्षेचे कामकाज उपकेंद्रसंचालक प्रा.बी पी माळवे, उपप्राचार्य प्रा वनिता खडके प्राचार्य डॉ गजानन खाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,कोल्हापूर विभागीय मंडळ, कोल्हापूर चे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या बोर्ड परीक्षेचे लेखन कसे करावे यासाठी विषय तज्ज्ञांकडून युट्यूब द्वारे विडिओ निर्मिती केली आहे.
विद्यार्थ्यांनी परीक्षा कालावधीत ताणतणाव, टेन्शन न घेता आल्हाददायक वातावरणात परीक्षेला सामोरे जावे या अनुषंगाने आज मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांनी सुद्धा हा घेतलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
विद्यार्थी प्रतिक्रिया*(समृद्धी जांभळे ,एस एम लोहिया काॅलेज)
सुरूवातीला या काॅलेजमध्ये येताना मला खुप भीती वाटली होती पण इथं आमचं स्वागत शिक्षकांनी गुलाबपुष्प देऊन आनंदाने केलं हे पाहून भीती निघून गेली.
पालकांची प्रतिक्रिया (पुनम पोवाळकर)
प्रथमतः या काॅलेजमध्ये माझ्या पाल्याचा नंबर आहे हे ऐकून मनात भीती वाटली होती.कारण तिथले वातावरण कडक व शिस्तबद्ध आहे हे ऐकले होते पण आज मी माझ्या मुलाला परीक्षेला घेऊन गेले तिथे आमच्या मुलांसोबत पालकांचे फुल देऊन स्वागत केले,तसेच सर्व विद्यार्थ्यांना भयमुक्त, आनंददायी वातावरणात पेपर कसे लिहावे या संदर्भात सूचना देऊन शुभेच्छा दिल्या.खुप आनंद झाला.

Comments
Post a Comment