शेंडा पार्क वैद्यकीय महाविद्यालयातील 224 कोटींच्या कामांमध्ये ‘महाभ्रष्टाचार’चा आरोप; मनसे कोल्हापूरचे आंदोलन

  शेंडा पार्क वैद्यकीय महाविद्यालयातील 224 कोटींच्या कामांमध्ये ‘महाभ्रष्टाचार’चा आरोप; मनसे कोल्हापूरचे आंदोलन



कोल्हापूर १८  सिटी न्यूज नेटवर्क 

 महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) कोल्हापूरच्या वतीने शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण व वाहनतळ विकास कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा महाभ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आले.


मनसे पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी संगनमत करून निविदा प्रक्रियेपूर्वीच काम पूर्ण केल्याचा गंभीर आरोप केला.


निविदेपुर्वीच काम पूर्ण केल्याचा दावा


B1/CE/12/24-25 या कामास 11 जुलै 2024 रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली. 29 जुलै 2024 रोजी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आणि 30 ऑगस्ट 2024 रोजी ठेकेदारास कार्यारंभ आदेश देण्यात आला.


मात्र, निविदा प्रक्रियेपूर्वीच 30 जून 2024 रोजीच काँक्रीट रस्ता पूर्ण झाल्याचे गुगल छायाचित्र जोडण्यात आल्याचा दावा मनसेने केला आहे. संबंधित छायाचित्रावर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असल्याचा आरोपही करण्यात आला.


224 कोटींच्या कामात 75 कोटींचा अपहार?


मनसेच्या म्हणण्यानुसार, पाच इमारतींसाठी 136 कोटी, रस्त्यांसाठी 65 कोटी, बॅडमिंटन कोर्ट व वाहनतळासाठी 8 कोटी, फर्निचरसाठी 15 कोटी असा एकूण 224 कोटी रुपयांचा निधी दाखवण्यात आला असून त्यापैकी सुमारे 75 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे.


 मोजमाप पुस्तिकेत खाडाखोड?


मनसेने मोजमाप पुस्तिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर खाडाखोड झाल्याचा आरोप केला आहे.


* नोंदींमध्ये तारखा नसणे

* पाने रद्द करून वाढीव दराने नव्याने मोजमाप नोंदवणे

* वेगवेगळ्या हस्ताक्षरात नोंदी

* फॉरेन्सिक तपासणीची मागणी


 दहापट दराने बिल?


एका किलोमीटर रस्त्यासाठी 1 लाख 16 हजार रुपये दराने काम करण्यास अन्य कंपनी तयार असताना संबंधित कामासाठी 10 लाख 16 हजार रुपये प्रति कि.मी. दराने बिल अदा केल्याचा दावा मनसेने केला आहे.


चौकशी व गुन्हा दाखल करण्याची मागणी


या प्रकरणी संबंधित अधिकारी व ठेकेदाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित/बडतर्फ करावे, तसेच संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने पारदर्शक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी मनसे कोल्हापूरच्या वतीने आंदोलनाद्वारे करण्यात आली.


दरम्यान, या सर्व आरोपांबाबत संबंधित विभागाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. प्रशासनाने सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

Comments