मुडशिंगीत पाटील दांपत्य भाजपमध्ये; गडमुडशिंगी–गोकुळ शिरगावचा सत्तासंकेत बदलला

मुडशिंगीत पाटील दांपत्य भाजपमध्ये; गडमुडशिंगी–गोकुळ शिरगावचा सत्तासंकेत बदलला



कोल्हापूर ०४ सिटी न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा धक्का काँग्रेसला बसला असून, मुडशिंगीच्या माजी जिल्हा परिषद सदस्य वंदना विजय पाटील आणि माजी पंचायत समिती सभापती विजय पाटील यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेल्या प्रभावी नेतृत्वाचा भाजपमध्ये प्रवेश म्हणजे काँग्रेसच्या संघटनात्मक अपयशावर शिक्कामोर्तब असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत आणि आमदार अमल महाडिक यांच्या विकासाभिमुख राजकारणावर विश्वास ठेवून पाटील पती-पत्नींनी भाजपची कास धरताच, गडमुडशिंगी व गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय गणिते एका झटक्यात बदलली आहेत. या दोन्ही मतदारसंघात पाटील दांपत्याची पकड, कार्यकर्त्यांची फळी आणि सामाजिक प्रभाव लक्षात घेता भाजपसाठी हा प्रवेश म्हणजे निवडणुकीपूर्वी मिळालेला मास्टर स्ट्रोक मानला जात आहे.

विशेष म्हणजे विकास कामांवर बोलण्याऐवजी केवळ अंतर्गत गटबाजी आणि निष्क्रिय नेतृत्वात अडकलेल्या काँग्रेसकडून कार्यकर्ते दुरावत असल्याचे या प्रवेशाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. “रात्रीचा दिवस करून भाजप उमेदवारांना विजयी करणार,” अशी थेट आणि आक्रमक ग्वाही पाटील दांपत्याने दिल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप आक्रमक रणनितीने मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

या प्रवेशावेळी विविध समाजांचे पदाधिकारी, माजी सरपंच, सहकारी संस्थांचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने भाजपला तळागाळातील सामाजिक बळ मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे काँग्रेससाठी हा प्रवेश केवळ एक गळती नसून, ग्रामीण भागातील विश्वासघाताची घंटा असल्याची चर्चा आहे.

एकंदरीत, मुडशिंगीतील पाटील दांपत्याचा भाजप प्रवेश हा काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरत असून, गडमुडशिंगी–गोकुळ शिरगाव परिसरात भाजपच्या सत्तास्थापनेचा रोडमॅप वेगाने आकार घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता या राजकीय भूकंपाचे पडसाद थेट मतपेटीत उमटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी जैन समाजाचे अध्यक्ष चारुदत्त तिपकोंडा पाटील, माजी सरपंच नरसगोंडा सातगोंडा पाटील, जवाहर कारखान्याचे मॅनेजर उत्तम दौलतराव कुंभार, कल्लाप्पाण्णा आवाडे सहकारी बँकेचे संचालक विष्णुपंत कुंभार, शितल भेंडवडे, सनी कोशिंबरे, विजय पाटील रोहित पाटील, आनंदा गुरव, तन्मय पाटील, अण्णासाहेब कुंभोजे, माजी उपसरपंच रोहित पाटील, महावीर व्हसामणी,माजी सरपंच राजगोंडा पाटील, माजी सरपंच सोनबा कोळी, अण्णासो पाटील सावकर, महावीर पाटील चिंचवडकर, महावीर पाटील,अण्णासो पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments