“जातिभेदाचं राजकारण करणाऱ्या काँग्रेसला शियेकरांनी नाकारलं पाहिजे; धनुष्यबाण हाच प्रगतीचा मार्ग” – आमदार चंद्रदीप नरके
“जातिभेदाचं राजकारण करणाऱ्या काँग्रेसला शियेकरांनी नाकारलं पाहिजे; धनुष्यबाण हाच प्रगतीचा मार्ग” – आमदार चंद्रदीप नरके
कोल्हापूर ०५ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्ह्यातील शिये मतदारसंघ हा हिंदुत्व आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या बालेकिल्ल्यातील एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आमदार चंद्रदीप नरके यांनी आक्रमक शब्दांत काँग्रेसवर टीका करत महायुतीच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. “कोट्यवधींची विकासकामे आणि लाखो रुपयांचा थेट फायदा सामान्य जनतेला देण्याची ताकद फक्त धनुष्यबाणधारी शिवसेनेत आहे,” असा ठाम दावा त्यांनी प्रचारसभेत केला.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी सरकार, राज्यात महायुतीची सत्ता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना-भाजपची भक्कम पकड असताना काँग्रेसच्या बिनकामाच्या उमेदवारांना निवडून देण्यात काहीही अर्थ नाही, असे सांगत आमदार नरके यांनी मतदारांना “आत्ताच धनुष्यबाण हातात घेऊन प्रगतीचा मार्ग स्वीकारा,” असे आवाहन केले.
यावेळी शिये गावचे जय शिंदे यांनी मतदारसंघात अफवा पसरवणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा देत धनुष्यबाणाच्या विचाराशी एकनिष्ठ राहण्याचे प्रबोधन केले. हिंदुत्ववादी नेते रामदास मोहिते यांनीही काँग्रेसवर कडाडून टीका करत, सामान्य कुटुंबातील महायुतीच्या उमेदवारांवर होणाऱ्या टीकेचा निषेध केला. “देशात बिनकामाचा ठरलेला काँग्रेस पक्ष आता मताची भीक मागत आहे,” असे ते म्हणाले.
माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील (नाना) यांनी मतदारांना कानभरणी आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करत, “देशापासून गल्लीबोळापर्यंत धनुष्यबाण हाच एकमेव ठोस निर्णय आहे,” असा विश्वास व्यक्त केला.
या प्रचारसभेला राजवर्धन पोवार, प्रणव पाटील, जय शिंदे, अमित पाटील, वैशालीताई चव्हाण, कृष्णात पोवार, वंदनाताई पाटील यांच्यासह शिये जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व सरपंच, सोसायटी चेअरमन व पदाधिकारी उपस्थित होते. हजारो मतदार बंधू-भगिनी आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीने सभा दणदणीत पार पडली.

Comments
Post a Comment