तरुणाईच्या प्रेमाला स्वॅगचा तडका! — ‘रुबाब’ ६ फेब्रुवारीपासून प्रदर्शित


तरुणाईच्या प्रेमाला स्वॅगचा तडका — ‘रुबाब’ ६ फेब्रुवारीपासून प्रदर्शित 




कोल्हापूर ०२ सिटी न्यूज नेटवर्क 

मराठी सिनेसृष्टीत स्टायलिश मांडणी, आधुनिक विचार आणि तरुणाईच्या भावविश्वाशी थेट जोडणारी एक हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे — ‘रुबाब’. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य सोहळ्यात प्रदर्शित झाला. ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर ‘रुबाब’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ या दमदार टॅगलाईनसह आलेला ‘रुबाब’ हा केवळ प्रेमपट नसून, स्वतःची ओळख जपणाऱ्या, आत्मसन्मानाने जगणाऱ्या आणि प्रेमासाठी ठाम उभ्या राहणाऱ्या आजच्या पिढीचा ठाम आवाज आहे. संभाजी ससाणे आणि शितल पाटील यांची फ्रेश जोडी, धारदार संवाद, स्वॅगदार सादरीकरण आणि भावनिक संघर्ष यामुळे ट्रेलरने तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

चित्रपटाचं संगीतही तितकंच लक्षवेधी ठरत आहे. पहिलं प्रेमगीत ‘कसं तरी होतंया रं’ मधून पहिल्या प्रेमातील निरागस, हळवे क्षण सुंदरपणे मांडण्यात आले आहेत. जावेद अली आणि सोनाली सोनवणे यांच्या आवाजाला चिनार–महेश यांच्या सुरेल संगीताची साथ लाभली आहे.
तर धमाकेदार ‘पॉम पॉम’ हे गाणं पार्टी, जल्लोष आणि उत्सवाचा नवा ठेका ठरणार आहे. नकाश अजीज आणि सोनाली सोनवणे यांच्या जोशपूर्ण गायकीमुळे हे गाणं प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये रंग भरणार आहे.
नुकतंच प्रदर्शित झालेलं रोमँटिक गाणं ‘मन जुळले’ प्रेमातील विश्वास, भावनिक जवळीक आणि नितळ नात्याचा सुंदर स्पर्श अनुभवायला लावतं. केतकी माटेगावकर यांच्या सुमधुर आवाजामुळे हे गाणं प्रेमात असलेल्या प्रत्येक मनाचा आवाज ठरत आहे.

दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात, “‘रुबाब’ हा आजच्या पिढीच्या प्रेमाचा ठाम आवाज आहे. स्वतःच्या तत्त्वांवर जगणं, प्रेमासाठी उभं राहणं आणि भावना निर्भीडपणे व्यक्त करणं — हाच या चित्रपटाचा आत्मा आहे.”

झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, “आजचा प्रेक्षक स्वतःशी जोडणाऱ्या कथा पाहू इच्छितो. ‘रुबाब’ प्रेम, स्वप्नं आणि आत्मसन्मानाचा ठाम आवाज आहे. शेखर बापू रणखांबे यांच्या दिग्दर्शनातून ही रुबाबदार लव्हस्टोरी तरुणाईच्या भावविश्वाला प्रभावीपणे स्पर्श करेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.”

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. प्रमुख भूमिकेत संभाजी ससाणे आणि शितल पाटील झळकणार असून, ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

तरुणाईच्या प्रेमाची, स्वाभिमानाची आणि स्वॅगची गोष्ट मांडणारा ‘रुबाब’ ६ फेब्रुवारीपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे.



Comments