गाळेधारकांच्या भाडे प्रश्नांवर तोडगा काढा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची महापौरांकडे मागणी
गाळेधारकांच्या भाडे प्रश्नांवर तोडगा काढा
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची महापौरांकडे मागणी
कोल्हापूर, दि. १८ सिटी न्यूज नेटवर्क
गाळेधारकांच्या भाडे प्रश्नांसंदर्भात योग्य तो तोडगा काढून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने महापौर रुपाराणी संग्रामसिंह निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी महापौरपदी निवड झाल्याबद्दल रुपाराणी निकम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी निवेदन सादर करत २८ नोव्हेंबर २०२५ रोजी उपायुक्त शिल्पा दरेकर व संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीची आठवण करून दिली. त्या बैठकीत महानगरपालिका निवडणुकीनंतर गाळेधारकांच्या प्रश्नांवर निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, चर्चेनुसार गाळेधारकांचे म्हणणे न ऐकता इस्टेट विभागाकडून गाळे सील करण्याची कारवाई सुरू असल्याची तक्रार त्यांनी केली. सद्यस्थितीत सुरू असलेली कारवाई स्थगित करून सर्व संबंधितांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
२०१५ ते २०१९ च्या भाडे निर्धारणाचा वाद
महापालिकेने स्थापन केलेल्या भाडे व सुरक्षा ठेव निर्धारण समितीने सन २०१५ नंतरच्या भाड्याचा निर्णय पुढे घेण्याचे ठरवले होते. तरीही इस्टेट विभागाने २०१५ ते २०१९ या कालावधीतील डिमांड नोटिसा काढल्या. २०१५ च्या ठरावानुसार ज्या गाळ्यांचे मासिक भाडे १,०३४ रुपये होते, ते वाढून १९,१६६ रुपये करण्यात आले. ही वाढ समितीने सुचवलेल्या दरांपेक्षा अनेक पटीने अधिक असल्याने गाळेधारकांनी ते भाडे भरण्यास नकार दिला. परिणामी २०१५ ते २०१९ या कालावधीतील भाडे प्रलंबित आहे. या संदर्भात शासनस्तरावर प्रयत्न करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
२०१९ ते २०२५ साठी ‘अभय योजना’ लागू करण्याची मागणी
मानद सचिव अजित कोठारी यांनी २०१९ ते २०२५ या कालावधीतील थकीत भाडे अभय योजनेनुसार भरण्यास गाळेधारक तयार असल्याचे सांगितले. कोरोना काळातील आर्थिक अडचणींमुळे काहींना भाडे भरणे शक्य झाले नसल्याचे त्यांनी नमूद केले. २८ नोव्हेंबरच्या बैठकीत उर्वरित गाळेधारकांना अभय योजना लागू करण्याचा निर्णय झाला होता; मात्र त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. महापालिकेने अभय योजना लागू केल्यास सर्व थकीत भाडे भरण्यास गाळेधारक तयार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
महापौरांचे आश्वासन
महापौर रुपाराणी निकम यांनी गाळेधारकांना त्यांच्या भाड्याच्या मानाने अपेक्षित सुविधा मिळत नसल्याचे मान्य केले. तसेच पुढील आर्थिक वर्षात भाडेवाढीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले. प्रशासक राज नुकतेच संपल्याने सर्व बाबींचा सविस्तर अभ्यास करून योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आम सभेनंतर विशेष बैठक
२० फेब्रुवारी रोजी महापालिकेची आम सभा होणार असून २१ तारखेनंतर सर्व गाळेधारकांसोबत विशेष बैठक आयोजित करण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले.
या वेळी मानद सचिव प्रशांत शिंदे, संचालक संपत पाटील, राहुल नष्टे, किशोर काटवे, असिफ मोमीन, आण्णा दिक्षित, विजय दळवी तसेच अनेक गाळेधारक उपस्थित होते.

Comments
Post a Comment