मेरी वेदर मैदानावर भीमा कृषी प्रदर्शनात गर्दीचा महापूर; तीन दिवसांत १२ कोटींची उलाढाल

 मेरी वेदर मैदानावर भीमा कृषी प्रदर्शनात गर्दीचा महापूर; तीन दिवसांत १२ कोटींची उलाढाल



कोल्हापूर १५ सिटी न्यूज नेटवर्क 

 कोल्हापूर येथील मेरी वेदर मैदानावर सुरू असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकरी, महिला, युवक आणि बालकांची अक्षरशः उसळलेली गर्दी पाहायला मिळाली. तीन दिवसांत सुमारे १२ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.

प्रदर्शनातील सर्वात मोठे आकर्षण ठरला तो तेरा वेळा विक्रम नोंदवलेला हिंदकेसरी शर्यतीतील हरण्या बैल. त्याचबरोबर ३५० किलो वजनाचे डुक्कर, ९० व १२० किलो वजनाचे बोकड, एक टनाचा लाल कंधारी बैल, मुरा रेडे, ३३ इंचाचा घोडा, तीन वर्षांची राधा गाय, तसेच मारवाडी जातीचा ‘गब्बर’ स्टेलियन घोडा यांना पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली.

भाजीपाला व फळ विभागात ११ किलोचा भोपळा, १० किलोचा कोहळा, १० डझनांचा केळी घड, १५ किलो हळद गठ्ठा आदी विक्रमी उत्पादनांनी लक्ष वेधले. धान्य महोत्सव दालनात इंद्रायणी तांदूळ, आजरा घनसाळ, रत्नागिरी २४, सेंद्रिय गूळ, हळद, नाचणी आदी शेतमालाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

प्रदर्शनात कृषी विभाग व आत्माच्या विविध योजनांची माहिती, ड्रोनद्वारे फवारणी, एआय तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, दुधाळ जनावरांची निगा यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

प्रदर्शनाचा समारोप आज १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होणार असून, शेवटच्या दिवशी अधिकाधिक शेतकऱ्यांनी भेट द्यावी, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.

Comments