जिल्हापरिषेदेत महायुतीचा झेंडा; जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
कोल्हापूर ०९ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक २०२६ च्या निकालात महायुतीने वर्चस्व सिद्ध करत सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकत जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मतदारांनी दिलेल्या कौलामुळे जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमताचे चित्र निर्माण झाले आहे.
निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने २० जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसला १५, भाजपला १२, शिवसेनेला ९, शिवसेना (ठाकरे गट) ७, तर जनसुराज्य ६ जागा मिळाल्या आहेत. इतर पक्षांना ५ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे जिल्हा परिषदेत महायुतीची पकड अधिक मजबूत झाली आहे.
निवडणूक निकालानंतर जिल्हाभरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलाल उधळत, ढोल-ताशांच्या गजरात विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. “जे मनात तेच जिल्हा परिषदेत घडले” अशी प्रतिक्रिया मतदारांमधून उमटताना दिसली.
दरम्यान, पंचायत समिती निवडणुकांमध्येही महायुतीने आघाडी घेतल्याचे चित्र असून अनेक तालुक्यांत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसने एकाकी लढत दिली असली तरी अपेक्षित यश न मिळाल्याने पक्षाला आत्मपरीक्षणाची गरज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या निकालामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून, येणाऱ्या काळात जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Post a Comment