‘गोकुळ’ परिवाराचा मान उंचावला! जि.प. निवडीत यशस्वी सदस्यांचा भव्य सत्कार
कोल्हापूर, ता.२१ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्यावतीने जिल्हा परिषद सदस्यपदी निवड झालेल्या गोकुळ परिवारातील मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. हा सत्कार समारंभ गोकुळ प्रकल्प, शिरगाव येथे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला.
जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झालेल्या संचालक अमरसिंह पाटील, अभिजित तायशेटे, तसेच सौ. सुयशा अंबरिषसिंह घाटगे (व्हनाळी), कु. अमृता अरुण डोंगळे (घोटवडे), श्री. शिवाजी मुरलीधर जाधव (हुपरी) आणि श्री. अनिरुद्ध केदारी रेडेकर (पेद्रेवाडी) यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
“गोकुळ ही संस्था नव्हे, सशक्त कुटुंब” – नविद मुश्रीफ
यावेळी बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले,
“गोकुळ ही केवळ संस्था नसून एक सशक्त कुटुंब आहे. आपल्या परिवारातील सदस्य विविध क्षेत्रांत यश मिळवत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. हे यश केवळ व्यक्तीचे नसून संपूर्ण गोकुळ परिवाराच्या संस्कारांचे आणि सहकार्याचे फलित आहे.”
ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्य करताना ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांवर विशेष भर द्यावा. सहकारातून मिळालेली पारदर्शकता आणि जनसामान्यांप्रती असलेली संवेदनशीलता सार्वजनिक जीवनातही जपली गेली पाहिजे.
“सहकाराची परंपरा मार्गदर्शक ठरेल” – अमृता डोंगळे
सत्काराला उत्तर देताना कु. अमृता डोंगळे यांनी सांगितले,
“गोकुळ परिवाराने दिलेला सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. संघाने जपलेली सहकाराची परंपरा आणि समाजाशी असलेली नाळ पुढील कार्यकाळात मार्गदर्शक ठरेल. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करू.”
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही गौरव
यावेळी गोकुळमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला. सर्व सत्कारमूर्तींना गोकुळ परिवारातर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment