पाडळी खुर्द गटात सचिन पाटीलांचा आक्रमक प्रचार; गावागावांत थेट जनसंवाद, विकास आराखड्याची ठाम मांडणी
विकास हाच केंद्रबिंदू; पाडळी खुर्द गटात सचिन पाटील यांची जोरदार प्रचार फेरी
कोल्हापूर, ०१ सिटी न्यूज नेटवर्क
निवडणूक म्हणजे घोषणांची नव्हे, तर विकासाच्या ठोस आराखड्याची—हीच भूमिका घेऊन शिवसेनेचे अधिकृत जिल्हा परिषदचे उमेदवार सचिन पाटील पाडळी खुर्द गटातील गावांमध्ये प्रचार करत आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास साधण्याचा निर्धार त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना व्यक्त केला.
कोगेपासून प्रचाराला सुरुवात करत पाटील यांनी पाडळी खुर्द, वाशी, कर्दळीमुळे पिरवाडी, नंदवाळ, शेळकेवाडी, महे, वडाळा, कसबा बीड, सावरवाडी, शिरोली सादुमाळा, हिरवडे दुमाळा व सडोली माती दुमाळा या गावांत प्रचार फेऱ्या, बैठका आणि थेट जनसंवाद कार्यक्रम घेतले. प्रत्येक गावातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, आरोग्य सुविधा, शिक्षण व शेतकऱ्यांचे प्रश्न यांचा सखोल आढावा घेतला.
प्रचारादरम्यान सचिन पाटील म्हणाले, “गावागावातील समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत आहे. केवळ आश्वासनांपेक्षा विकास आराखड्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. जिल्हा परिषद स्तरावर निधी आणून रखडलेली कामे पूर्ण केली जातील.
कोगे येथील प्रचार फेरीत गोकुळचे माजी अध्यक्ष व संचालक विश्वासराव नारायण पाटील, कुंभी-कासारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व संचालक भगवान रामा पाटील, माजी उपाध्यक्ष विश्वास दत्तात्रय पाटील तसेच के. डी. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, पंचायत समिती निवडणुकीसाठी पाडळी खुर्द मतदारसंघातून अमित आप्पासो हजारे आणि शिरोली दुमाला मतदारसंघातून नामदेव शंकर खांडेकर हे उमेदवारही प्रचारात सक्रिय असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
“विकास हाच अजेंडा” या ठाम भूमिकेमुळे कोगेसह अनेक गावांतून चांगले मताधिक्य मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments
Post a Comment