भीमा कृषी प्रदर्शन : चार दिवसांत गर्दीचा उच्चांक; १८ कोटींची उलाढाल, एआयमुळे उत्पादन दीडपट – ना. चंद्रकांत दादा पाटील
भीमा कृषी प्रदर्शन : चार दिवसांत गर्दीचा उच्चांक; १८ कोटींची उलाढाल, एआयमुळे उत्पादन दीडपट – ना. चंद्रकांत दादा पाटील
कोल्हापूर १६ सिटी न्यूज नेटवर्क
मेरी वेदर मैदानावर १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान पार पडलेल्या भीमा कृषी प्रदर्शन ला चारही दिवस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शेतकरी, नागरिक, विद्यार्थी आणि आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत गर्दीचा उच्चांक प्रस्थापित केला. प्रदर्शनात चार दिवसांत सुमारे १८ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.
समारोप प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “एआय ही जादू असून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दीडपट करण्याची क्षमता त्यात आहे. शहरातील सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध झाल्या तर स्थलांतर थांबेल आणि शेतीची खरी प्रगती होईल.” त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराचे कौतुक करत कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरत असल्याचे नमूद केले.
पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनीही शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन केले. कोल्हापूर हा कृषीप्रधान जिल्हा असून उसाबरोबरच इतर पिकांकडेही शेतकऱ्यांनी वळावे, असे ते म्हणाले.
🏆 बेस्ट ऑफ द शो आणि चॅम्पियन ऑफ द शो
किशोर वसंत चव्हाण (मुंबई, कांदिवली) यांचा पाच फूट लांबीचा इगवाना सरडा – बेस्ट ऑफ द शो
कुलदीप बळीराम लाड (माळसोना, जि. परभणी) यांचा लाल कंधारी वळू – चॅम्पियन ऑफ द शो
🐂 जनावरांचे आकर्षण
प्रदर्शनात एक टन वजनाचा लाल कंधारी बैल, १४७० किलोचा मुरा रेडा, जाफराबादी सुलतान, पंढरपुरी रेडा, गीर वळू, कंकरेज वळू, खिल्लार गायी, एचएफ-जर्सी गायी, तसेच अमेरिकन बॅनटम बोकड, ३५० किलोचे लार्ज व्हाईट पिग, मारवाडी स्टेलियन ‘गब्बर’, ब्ल्यू गोल्ड मकाऊ पोपट, विविध जातीचे पक्षी आदींनी विशेष आकर्षण ठरले.
शतकवीर हिंदकेसरी शर्यतीतील हरण्या बैल, तीन वर्षांची राधा गाय, ३३ इंचाचा घोडा, ११ किलोचा भोपळा, १० डझनाचा केळी घड, १५ किलोची हळद, अर्धा किलो कांदापात, देशी काळा ऊस अशा कृषी व पशुधन नमुन्यांनी शेतकऱ्यांचे लक्ष वेधले.
💰 विक्रीत मोठी उलाढाल
शेती साहित्य, बियाणे, औजारे यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी
महिला बचत गटांची २५ लाखांची उलाढाल
बेगम राजू मुजावर – बिर्याणी विक्री ₹१.१० लाख
अमृता भोकरे – मासे विक्री ₹१ लाख
ज्योती धावडे – ₹५४,७०० विक्री
कल्याणी भिमगोंडा – ₹४२,००० विक्री
प्रगतशील शेतकरी सर्जेराव धनवडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
धान्य महोत्सव दालनात दोन दिवसांत इंद्रायणी तांदूळ, आजरा घनसाळ, रत्नागिरी २४, सेंद्रिय गूळ, नाचणी, सेंद्रिय हळद आदींची हजारो किलो विक्री झाली.
🥇 पशु-पक्षी स्पर्धांचे निकाल
खिल्लार गाय, मुरा रेडा, जाफराबादी, पंढरपुरी, गीर, कंकरेज, लाल कंधारी, जर्सी, एचएफ, पुंगनूर, बिटल बोकड, अमेरिकन बॅनटम, अश्वगट आदी विविध गटांमध्ये राज्यभरातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. विजेत्यांना मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
🎤 तज्ज्ञांचे मार्गदर्शन
भाजीपाला सुधारित लागवड, परदेशी भाजीपाला तंत्रज्ञान, कृषी विभागाच्या योजना, ऊस व्यवस्थापन आणि ‘डिजिटल मित्र महा विस्तार एआय’ अॅप्लिकेशनविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर आदींचे सहकार्य लाभले.
चार दिवस चाललेल्या या भव्य कृषी सोहळ्याने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, पशुधन आणि बाजारपेठेची जोड देत कृषी क्षेत्राला नवे बळ दिले. भीमा कृषी प्रदर्शनाने पुन्हा एकदा राज्यातील अग्रगण्य कृषी महोत्सव म्हणून आपली ओळख अधोरेखित केली.

Comments
Post a Comment