India AI Impact Summitमध्ये Jio Platformsकडून ‘नेशन-फर्स्ट AI स्टॅक’ची रूपरेषा सादर
स्वदेशी आणि सॉवरेन AI इकोसिस्टमवर भर | ग्रीन डेटा सेंटरपासून भारतीय भाषांपर्यंत संपूर्ण AI व्हॅल्यू चेनवर लक्ष
नवी दिल्ली, १८ सिटी न्यूज नेटवर्क
: India AI Impact Summitमध्ये Jio Platformsने आपल्या ‘नेशन-फर्स्ट AI स्टॅक’ची महत्त्वाकांक्षी रूपरेषा सादर केली. कंपनी या तंत्रज्ञानाला ‘जिओ AI स्टॅक’ असे संबोधत असून, भारताच्या गरजा आणि मोठ्या प्रमाणातील मागणी लक्षात घेऊन ते विकसित केले जात असल्याचा दावा करण्यात आला.
‘जिओ AI स्टॅक’ हा केवळ डेटा सेंटरपुरता मर्यादित नसून पूर्ण-स्टॅक AI इकोसिस्टम म्हणून उभारला जात आहे. यात गिगावॅट स्तरावरील ग्रीन डेटा सेंटर, उच्च क्षमतेची कंप्युटिंग व्यवस्था, विविध प्लॅटफॉर्म आणि फ्रेमवर्क, भारतीय भाषांवर आधारित डेटा फाउंडेशन, बहुभाषिक इंटेलिजन्स लेयर आणि विविध क्षेत्रांसाठी अप्लिकेशनचा समावेश आहे.
देशात मल्टी-गिगावॅट AI डेटा सेंटर उभारले जात असून ते १०० टक्के ग्रीन एनर्जीवर चालणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे राष्ट्रीय स्तरावर शाश्वत आणि ऊर्जा कार्यक्षम AI क्षमता विकसित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
कंपनीच्या मते, ‘जिओ AI स्टॅक’ ही सॉवरेन AI इकोसिस्टम असेल—म्हणजे देशात विकसित होऊन राष्ट्रीय गरजांनुसार कार्यरत राहणारी व्यवस्था. आरोग्य, शिक्षण, शेती, लघुउद्योग आणि दैनंदिन सेवांसाठी AI आधारित उपाय उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
भारतीय भाषांमध्ये सक्षम इंटेलिजन्स विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. व्यापक भारतीय भाषांचे डेटा सेट तयार केले जात असून सुरक्षित, बहुभाषिक व्हॉइस AI आणि एजेंटिक प्लॅटफॉर्मवर काम सुरू आहे. वापरकर्त्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत सहज AI संवाद साधता यावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
तज्ज्ञांच्या मते, भारतातील AI क्षेत्रातील स्पर्धा आता केवळ तांत्रिक क्षमतेपुरती मर्यादित नसून डेटा सार्वभौमत्व, ऊर्जा कार्यक्षमता, भाषिक विविधता आणि मोठ्या प्रमाणावरील उपलब्धता यांसारख्या घटकांशी जोडली गेली आहे. अशा पार्श्वभूमीवर ‘जिओ AI स्टॅक’सारख्या मॉडेल्सचा देशाच्या दीर्घकालीन डिजिटल आणि आर्थिक विकासावर नेमका किती परिणाम होतो, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

Comments
Post a Comment