आज देशव्यापी संप : SPE कायद्याच्या संरक्षणासाठी विक्री प्रतिनिधींची एकजूट

 आज देशव्यापी संप : SPE कायद्याच्या संरक्षणासाठी विक्री प्रतिनिधींची एकजूट



कोल्हापूर १२ सिटी न्यूज नेटवर्क 

 सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज (SPE) अ‍ॅक्टला 50 वर्षे पूर्ण होत असताना आज 12 फेब्रुवारी रोजी देशभरातील विक्री व वैद्यकीय प्रतिनिधींनी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह्ज असोसिएशन ऑफ इंडिया (FMRAI), महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह्ज असोसिएशन (MSMRA) तसेच CITUच्या संयुक्त आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे संघटनांनी सांगितले.

संघटनांच्या पत्रकानुसार, केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कामगार संहितांमुळे कामगारांच्या हक्कांवर परिणाम होत असून, 1976 च्या SPE कायद्याअंतर्गत मिळणारे संरक्षण कमकुवत होत आहे. या निषेधार्थ आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी आजचा संप करण्यात आला आहे.

SPE कायद्याचे महत्व

1976 साली लागू झालेल्या सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज (कंडिशन्स ऑफ सर्व्हिस) अ‍ॅक्टमुळे विक्री प्रतिनिधींना औद्योगिक वाद कायदा, किमान वेतन कायदा, बोनस, ग्रॅच्युइटी, मातृत्व लाभ यांसारख्या कायद्यांचे संरक्षण मिळाले. नियुक्तीपत्र, सेवा पुस्तिका, रजेची नोंद यांसारख्या बाबी बंधनकारक करण्यात आल्या.

संघटनांचे म्हणणे आहे की, नव्या श्रम संहितांमुळे नोकरीतील सुरक्षितता, वेतन संरचना आणि सामाजिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते.

प्रमुख मागण्या

  • चार नवीन कामगार संहितांमध्ये आवश्यक दुरुस्ती

  • SPE अ‍ॅक्ट 1976 ची काटेकोर अंमलबजावणी

  • 8 तासांच्या कामाचा नियम आणि वेतन संरक्षण

  • किमान वेतन व सामाजिक सुरक्षा योजना लागू करणे

  • अन्यायकारक कामगार कपात थांबवणे

आजच्या संपामुळे औषध विक्री व संबंधित क्षेत्रातील कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “लढेंगे, जीतेंगे” असा नारा देत विक्री प्रतिनिधींनी आपल्या हक्कांसाठी एकजूट दाखवली आहे.

Comments