गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती एकत्र लढणार; जास्तीत जास्त ठराव जमा करा – खासदार धनंजय महाडिक


गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती एकत्र लढणार; जास्तीत जास्त ठराव जमा करा – खासदार धनंजय महाडिक



कोल्हापूर ०६ सिटी न्यूज नेटवर्क 
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध संघाची आगामी पंचवार्षिक निवडणूक महायुती एकत्रितपणे लढवणार असल्याची घोषणा खासदार धनंजय महाडिक यांनी केली. विरोधकांच्या दडपशाहीला बळी न पडता जास्तीत जास्त ठराव महायुतीकडे जमा करावेत, असे आवाहनही त्यांनी दूध संस्था चालकांना केले.

जिल्ह्यातील गोकुळ दूध संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक भाजप कार्यालयात खासदार महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संचालिका शौमिका महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत आगामी निवडणुकीसाठी मोर्चाबांधणी आणि रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली.

गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत मे महिन्यात संपत असून एप्रिलमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. संघाच्या २५ संचालक पदांसाठी ही निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांइतकेच सहकार आणि राजकीय क्षेत्रात गोकुळच्या निवडणुकीला मोठे महत्त्व आहे.

यावेळी बोलताना संचालिका शौमिका महाडिक यांनी सांगितले की, मागील निवडणुकीत गोकुळमधील सत्ता थोडक्यात हुकली होती. त्या वेळी झालेल्या चुका सुधारून आता नव्या जोमाने निवडणुकीला सामोरे जावे लागेल. महायुतीचे एकत्रित पॅनेल उभे केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोकुळच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनेक प्रश्नांवर संघर्ष करावा लागला आहे. मात्र आता गोकुळमध्ये महायुतीची सत्ता येईल आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना सर्वच बाबतीत दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले की, आगामी गोकुळ निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती एकत्र लढवणार आहे. विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती गोकुळ निवडणुकीतही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधकांच्या दबावाला न जुमानता जास्तीत जास्त ठराव भाजपकडे जमा करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. गोकुळ निवडणुकीत महाविकास आघाडीचे मोठे आव्हान नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या चार दिवसांत जाहीर करतील, अशी माहिती खासदार महाडिक यांनी दिली.

या बैठकीस माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर, समजितसिंह घाटगे, अमरिष घाटगे, दिलीप पाटील, स्वाती कोरी, संजय पाटील, उमेश आपटे, नाथाजी पाटील, रवीश पाटील-कौलवकर, आनंद गुरव, भिकाजी जाधव, प्रविणसिंह पाटील, अशोक चराटी यांच्यासह जिल्ह्यातील विविध दूध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments