मिरजकर तिकटी येथे 'हिंदू एकता'तर्फे श्रीराम नवमी उत्साहात; ३००० हून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

 मिरजकर तिकटी येथे 'हिंदू एकता'तर्फे श्रीराम नवमी उत्साहात; ३००० हून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ



कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क 

येथील ऐतिहासिक मिरजकर तिकटी येथे हिंदू एकता आंदोलन, कोल्हापूर यांच्या वतीने श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, शनिवारी (२८ मार्च) आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाप्रसादाचा लाभ ३००० हून अधिक रामभक्तांनी घेतला, अशी माहिती हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख दिपक देसाई यांनी दिली.

भक्तीमय वातावरणात महाआरती

शनिवारी दुपारी ठीक १२ वाजता मिरजकर तिकटी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा करण्यात आली. संघटनेच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने आणि भावपूर्ण वातावरणात महाआरती संपन्न झाली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व भाविकांनी दिलेल्या 'जय श्री राम' च्या जयघोषाने संपूर्ण मिरजकर तिकटी परिसर दुमदुमून गेला होता.

भजन व कीर्तनाने रंगली आध्यात्मिक मैफल

उत्सवानिमित्त फुलेवाडी येथील स्वामी समर्थ महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या भजनामुळे मंडपातील वातावरण भक्तीरसात न्हाऊन निघाले होते. याच चैतन्यमयी वातावरणात दुपारपासून महाप्रसादाचे वाटप सुरू झाले.

नियोजनासाठी कार्यकर्त्यांची मेहनत

या सोहळ्याचे नेटके नियोजन हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दिपक देसाई, शहराध्यक्ष विलास मोहिते, हिंदूराव शेळके, आनंदराव कवडे,अजिंक्य आपके, अजित तोडकर, बापू चव्हाण, श्रीकांत पाऊंडकर, बाबा पारटे, दिलीप भिवटे, अनिकेत पवार, विशाल पाटील, बबन लगारे, नंदकुमार आहीर, उत्तम भोसले, राजेंद्र करंबे,  बापू वडगावकर, पांडुरंग कदम, कुमार काटकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले. दिवसभरात हजारो नागरिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेतला.

Comments