महाराष्ट्रात बनावट बियाणे-खतांचा कहर; शेतकऱ्यांना भरपाई द्या – खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत जोरदार मागणी

 महाराष्ट्रात बनावट बियाणे-खतांचा कहर; शेतकऱ्यांना भरपाई द्या – खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत जोरदार मागणी



कोल्हापूर, दि. २५ सिटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आज खासदार Dhananjay Mahadik यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला वाचा फोडत निकृष्ट बियाणे आणि बनावट खतांच्या विक्रीमुळे होत असलेल्या मोठ्या नुकसानाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले.



संसदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे बियाणे आणि बोगस खतांची विक्री वाढली असून त्याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होत आहे. बियाण्यांची उगवण कमी होणे, उत्पादनात मोठी घट येणे आणि त्यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढणे, ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

तसेच, बनावट खतांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून पिकांच्या गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतीवर आधारित ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

खासदार महाडिक यांनी सरकारकडे पुढील मागण्या केल्या:

  • दोषी विक्रेते व कंपन्यांवर कठोर कारवाई करावी

  • बियाणे व खतांच्या गुणवत्तेची स्वतंत्र चौकशी करावी

  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी

  • शासकीय तपासणी यंत्रणा अधिक सक्षम करावी

  • जनजागृती मोहिमा राबवून शेतकऱ्यांना सतर्क करावे

तंबाखूविरोधी जाहिरातींसारखीच बनावट बियाणे व खतांविरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, अशीही त्यांनी मागणी केली.

शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाला संसदेत आवाज मिळाल्याने आता केंद्र सरकार कोणती ठोस भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments