पंचगंगा घाटावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; अग्निशमन दलासह सोयीसुविधा वाढवण्याची मागणी
कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क
श्री क्षेत्र जोतिबा यात्रेनिमित्त लाखो भाविकांची गर्दी होत असताना पंचगंगा घाट परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काल घडलेल्या घटनेत दोन महिला भाविक पाण्यात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली. सुदैवाने स्थानिक नागरिक आणि उपस्थित भाविकांच्या तत्परतेमुळे दोघींनाही सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
या पार्श्वभूमीवर श्री जोतिबा भाविक भक्त समितीचे समन्वयक किशोर घाटगे यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
घाटावर दररोज हजारो भाविक स्नानासाठी येत असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाची तैनाती करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. यासोबतच घाट परिसराची नियमित स्वच्छता, सुलभ शौचालयांची व्यवस्था, तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
तसेच यात्रेदरम्यान वाढणाऱ्या गर्दीचा फायदा घेत मोबाइल चोरी व भुरट्या चोऱ्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असेही समितीने नमूद केले आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्वरित पावले उचलून भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
.jpeg)
Comments
Post a Comment