१७ राज्यांतील कलाकार एकाच छताखाली; सिद्धगिरी कारागीर महाकुंभाची सुरुवात
कोल्हापूर (कणेरी) ३१ सिटी न्यूज नेटवर्क
श्री सिद्धगिरी संस्थान मठ, कणेरी आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’ उत्सवाचा भव्य शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाला. हा महोत्सव ३१ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान पार पडणार असून देशभरातील कारागिरांचा हा अनोखा संगम ठरत आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना ना. पाटील यांनी सांगितले की, या महाकुंभामुळे पारंपारिक कला आणि हस्तकलेला मोठी चालना मिळणार आहे. विशेषतः महिलांसाठी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत करता येतील अशी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या महाकुंभात देशातील १७ राज्यांतील २०० हून अधिक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त कलाकार सहभागी झाले आहेत. टेराकोटा, बांबू काम, लेदर वर्क, पिंगुळी चित्रकला, भिल्ल कला, कच्छची राबरी कला, पैठणी, बनारसी साड्या अशा विविध हस्तकलेचे आकर्षक प्रदर्शन आणि विक्री येथे उपलब्ध आहे.
याशिवाय अभियांत्रिकी, आयटीआय आणि विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनीही आपल्या नवकल्पना आणि प्रकल्प सादर केले आहेत. स्टार्टअपसाठी दहा लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कार्यक्रमाला पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. इचलकरंजीसह विविध भागांतून महिलांसाठी मोफत वाहतुकीची सोय करण्यात आली आहे.
हा महाकुंभ ४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments
Post a Comment