यात्रेकरूंसाठी मोफत दुचाकी दुरुस्ती सेवा; जोतिबा यात्रेत उपक्रमाचे आयोजन

 यात्रेकरूंसाठी मोफत दुचाकी दुरुस्ती सेवा; जोतिबा यात्रेत उपक्रमाचे आयोजन


File photo 



कोल्हापूर, ता. २९ सिटी न्यूज नेटवर्क 

जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त यात्रेकरूंच्या सेवेसाठी कोल्हापूर वेस्ट ट्रेनिंग टू व्हीलर मेकॅनिक वेल्फेअर असोसिएशनतर्फे दुचाकी वाहनांची मोफत दुरुस्ती व पंक्चर सेवा राबविण्यात येणार आहे. मंगळवार (ता. ३१) ते बुधवार (ता. १) या दोन दिवसांत हा उपक्रम पार पडणार आहे.

या उपक्रमात सुमारे १०० मेकॅनिक व पंक्चर कारागिरांचा सहभाग असणार असून, उचगाव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ऑटोमोबाईल विभागाचेही सहकार्य लाभणार आहे. यात्रेकरूंना प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन मंगळवारी (ता. ३१) सकाळी ९ वाजता शनिवार पेठेतील सोन्यामारुती चौक येथील राधेय ऑटो सेंटर येथे होणार आहे. यासोबतच यात्रेकरूंसाठी थंडगार पाणी वाटपाचाही उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी संयोजक संजय पाटणकर, वैभव पाटणकर, प्रवीण देवकर, प्रशांत साळोखे, विनोद म्हाळुंगे, रवी चिले, संदीप पाटील, प्रशांत जाधव, संदीप कदम, अभी हणबर, शिवाजी लोहार आदींचा सक्रिय सहभाग राहणार आहे.

Comments