अहिंसा आणि शांततेचा संदेश; महावीर जयंतीला भव्य मिरवणूक
कोल्हापूर, ३१ (सिटी न्यूज नेटवर्क)
भगवान महावीर जयंतीनिमित्त कोल्हापूर येथील सकल जैन श्वेतांबर राजस्थानी मारवाडी समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या शोभायात्रेत घोडे, बैलगाड्या, बग्गी, घोडागाड्या तसेच बँड आणि हलगी यांचा आकर्षक समावेश होता. चांदीच्या रथामध्ये भगवान महावीरांची प्रतिमा विराजमान करून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
“जियो और जीने दो” आणि “अहिंसा परमो धर्म” हा भगवान महावीरांचा संदेश समाजात रुजावा तसेच देश-विदेशात शांतता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी परमपूज्य आचार्य चिरंतनरत्न सुरीश्वरजी महाराज आदी ठाणा, पन्यास विनयशेखर विजयजी महाराज, कृतार्थशेखर महाराज तसेच कोल्हापूरातील विविध जैन संघात विराजमान असलेले साधू-साध्वीजी भगवंत उपस्थित होते. शोभायात्रेत सहभागी झालेले सर्व श्रावक पांढऱ्या वेशात तर श्राविका लाल चुनरीत सहभागी झाल्याने वातावरण भक्तिमय झाले होते.
या शोभायात्रेत श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर (गुजरी), श्री मुनिसुव्रत स्वामी जैन श्वेतांबर मंदिर, श्री वासुपूज्य स्वामी जैन श्वेतांबर मंदिर, श्री आशापुरण पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर, शत्रुंजय सोसायटी जैन श्वेतांबर मंदिर, श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर (ग्रीन एमराल्ड), नवग्रह मंदिर मिराभक्ती, श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिर ट्रस्ट आदींसह विविध जैन संघ, ट्रस्टचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सामुदायिक वरघोडा गुजरी मंदिर येथून सुरू होऊन महाद्वार रोड, भेंडे गल्ली, शिवाजी चौक, शिवाजी रोड, बिंदू चौक, लक्ष्मीपुरी मंदिर, आईसाहेब पुतळा, महानगरपालिका, पुन्हा शिवाजी चौक, गुजरी बाजार मार्गे गुजरी मंदिर येथे विसर्जित झाला.
महावीर जन्मकल्याणकानिमित्त १५ वर्षांखालील सुमारे १३० मुला-मुलींनी आयंबिल केले, तर कोल्हापूर संघातील श्रावक-श्राविकांनी सुमारे ४५० आयंबिल साधना केली.
या प्रसंगी जैन समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन करण्यात आले. वरघोडा विसर्जनानंतर गुजरी आराधना भवन येथे गुरु वंदना, मांगलिक प्रवचन झाले. त्यानंतर बूंदी-शेव यांची प्रभावना देण्यात आली.

Comments
Post a Comment