कोल्हापुरात रंगणार ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’ – देशभरातील २०० हून अधिक कलाकारांचा सहभाग
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
श्री सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर व पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३१ मार्च २०२६ ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’चे भव्य आयोजन करण्यात असल्याची माहिती श्री सिद्धगिरी संस्थान मठाचे मठाधिपती प.पू.काडसिद्धेश्वर स्वामी यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.
या महाकुंभामध्ये पारंपारिक कला, हस्तकला व लोककलेतील स्थानिक तसेच देशभरातील कलाकार आपले कौशल्य प्रत्यक्ष सादर करणार आहेत. बदलत्या काळानुसार आणि ग्राहकांच्या आवडीनुसार विकसित झालेल्या विविध कलाप्रकारांची झलक येथे पाहायला मिळणार आहे. कलाकारांच्या कौशल्यातून साकारलेल्या आकर्षक व दर्जेदार वस्तूंना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी मागणी आहे.
या कारागीर महाकुंभासाठी देशातील सुमारे १७ राज्यांमधून २०० हून अधिक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त कलाकार सहभागी होणार असून, ते आपल्या कलेचे थेट प्रात्यक्षिक सादर करतील. तसेच त्यांच्या हस्तकलेतील विविध उत्पादने विक्रीसाठीही उपलब्ध असतील.
या महाकुंभात टेराकोटा कला, मातीची ज्वेलरी, मातीची खेळणी, वुड क्राफ्ट, बांबू काम, लेदर वर्क, विविध राज्यांतील एम्ब्रॉयडरी व पॅचवर्क, पिंगुळी चित्रकला, आदिवासी चित्रकला, धागा चित्रकला, ऐतिहासिक बाहुल्या, स्टोन वर्क, कच्छची राबारी कला, ग्लास वर्क, मक्याच्या कणसापासून तयार वस्तू, मधुबनी पेंटिंग, लाकडी बांगड्या, महाराष्ट्राची पैठणी, बंजारा कला, बनारसी जरदोशी साड्या आदी विविध प्रकारच्या हस्तकलेचा समावेश असणार आहे.
तसेच तंत्रशिक्षण घेणारे विद्यार्थी — अभियांत्रिकी महाविद्यालये, पॉलिटेक्निक, आयटीआय व इतर शिक्षणसंस्थांतील युवक-युवती — यांना विशेषतः या महाकुंभाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पारंपारिक कलांना आधुनिकतेची जोड देऊन लघुउद्योग निर्माण करण्यासाठी ही संधी उपयुक्त ठरणार आहे.
हा ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’ हा एक आगळावेगळा सांस्कृतिक आणि उद्योजकीय उपक्रम असून, कोल्हापूर व परिसरातील नागरिकांनी स्वतः उपस्थित राहून तसेच मित्र-नातेवाईकांना प्रोत्साहित करून या उपक्रमास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
यामुळे देशभरातील कारागीरांचा सन्मान होऊन त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ आणि गौरव प्राप्त होईल.


Comments
Post a Comment