मुंबईतील आंतरराष्ट्रीय फिडे बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनुरकरचा पाचवा क्रमांक
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
नेरुळ (नवी मुंबई) येथे अंजनीबाई चेस अकॅडमीतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनुरकर याने उल्लेखनीय कामगिरी करत पाचवा क्रमांक पटकावला.
ऋषिकेशने स्पर्धेतील ९व्या फेरीत विजय मिळवत एकूण ८ गुणांची कमाई केली. या यशाबद्दल त्याला ८,००० रुपये रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच त्याने ८ फिडे मानांकन गुणांचीही भर घातली.
या स्पर्धेत एकूण ५२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता, त्यापैकी ३१३ खेळाडू मानांकित होते. स्पर्धेसाठी एकूण ३ लाख रुपयांची रोख पारितोषिके व २५० चषक ठेवण्यात आले होते.
स्पर्धेत रायगडच्या पारस दिलीप भोईर याने ८.५ गुणांसह अजिंक्यपद पटकावले. त्याला २०,००० रुपये रोख पारितोषिक व चषक देण्यात आला.
ऋषिकेश कबनुरकर हा कोल्हापूर येथील अनुज चेस अकॅडमी (दाभोळकर कॉर्नर, ताराबाई पार्क) येथे सराव करतो. तो विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे तसेच कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे माजी सचिव कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


Comments
Post a Comment