गूढ आणि धक्कादायक सत्य… ‘सालबर्डी’चा रहस्यमय

 गूढ आणि धक्कादायक सत्य… ‘सालबर्डी’चा रहस्यमय थरार


कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क 

इतिहासाच्या अंधाऱ्या कप्प्यांत दडलेली रहस्यं, गुन्ह्यांच्या गुंतागुंतीतून उलगडणारं सत्य आणि थरारक प्रवास… असा भन्नाट अनुभव घेऊन येतोय ‘सालबर्डी’ हा मराठी चित्रपट.

नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारलेला ‘सालबर्डी’ हा चित्रपट १७ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना रहस्य, थरार आणि गुन्हेगारीच्या जगात घेऊन जाणार आहे.

चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली आहे, तर दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी समर्थपणे सांभाळली आहे.

कथानक इतिहासाच्या अंधाऱ्या कप्प्यांत दडलेल्या रहस्यांभोवती फिरतं. या रहस्यांचा मागोवा घेताना समोर येणाऱ्या धक्कादायक सत्यांमुळे प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहतील, असा विश्वास चित्रपटाच्या टीमला आहे.

या चित्रपटात पूजा सावंत पोलिस अधिकाऱ्याच्या दमदार भूमिकेत झळकणार असून, पीआय मनोरमा प्रधान ही तिची व्यक्तिरेखा कथेला वेगळीच धार देते. तिच्यासोबत शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर आणि कोमल चौधरी यांसारख्या कलाकारांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.


चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे त्यातील विविध जॉनरची गाणी. प्रत्येक गाणं कथानकाला अधिक गहिरं करत प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या जोडून ठेवतं. गीतांना गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांचे शब्द लाभले असून, पद्मनाभ गायकवाड यांनी संगीत दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.

गायक अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने गाणी अधिक रंगतदार झाली आहेत.


छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे असून, पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांनी लिहिले आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे.


रहस्य, थरार आणि भावनांचा संगम असलेला ‘सालबर्डी’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि रोमहर्षक अनुभव ठरणार आहे.

Comments