अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात कोल्हापुरात 24 मे रोजी महापरिषद; आंबेडकरी संघटनांची शाहू स्मारक भवन येथे बैठक
अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात कोल्हापुरात 24 मे रोजी महापरिषद; आंबेडकरी संघटनांची शाहू स्मारक भवन येथे बैठक
कोल्हापूर, दि २५ सिटी न्यूज नेटवर्क
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात कोल्हापूर येथे येत्या 24 मे रोजी भव्य महापरिषद आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे यांनी दिली.
यासंदर्भात आज कोल्हापूर शहरातील शाहू स्मारक भवन येथे विविध आंबेडकरी पक्ष व संघटनांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रा. कांबळे यांनी सांगितले की, प्रस्तावित उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमध्ये जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणताही परिपूर्ण अभ्यास किंवा अद्ययावत जनगणना न करता हा निर्णय घेतला जात असल्याने समाजात असंतोष वाढू शकतो. त्यामुळे या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी देशभरातील आरक्षण तज्ञांना महापरिषदेसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे.
या बैठकीस रूपाली वायदंडे, बी. के. कांबळे, बाजीराव नाईक, संजय जिरगे, सुरेश सावंत, किशोर सडोलीकर, सुशील कोल्हटकर, प्रताप बाबर, सरदार कांबळे, मलिक चिकडोळे, बटू कांबळे, प्रवीण आजरेकर, दादासो माने आदी उपस्थित होते.
दरम्यान, 24 मे रोजी होणाऱ्या महापरिषदेकडे राज्यभरातील आंबेडकरी समाजाचे लक्ष लागले असून या परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Post a Comment