गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावर तात्काळ बंदी घाला ! - हिंदुत्वनिष्ठांची आंदोलनाद्वारे मागणी
गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावर तात्काळ बंदी घाला - हिंदुत्वनिष्ठांची आंदोलनाद्वारे मागणी
‘एकेरी उल्लेख’ न हटवणार्या प्रकाशक आणि संबंधित संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐकेरी उल्लेख करून महाराजांचा अवमान, तर करतेच इतकेच नाही या, तर पुस्तकात अनेक घटना या इतिहासाचे विकृतीकरण करून खोटा इतिहास बिंबण्यासाठी लिहिल्या गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रखर, जाज्वल्य, दैदिप्यमान, पराक्रमी इतिहास लोकांसमोर ठेवण्याऐवजी या पुस्तकातून खोटा इतिहास मांडण्यात आला आहे. शिवरायांच्या भवानी तलवारीचीसुद्धा अशीच अवहेलना केली आहे. यात भवानी देवीने छत्रपती शिवाजी महाराज यांना तलवार दिलीच नाही, असे लिखाण करण्यात आले आहे. हा प्रकार म्हणजे हिंदू अस्मितेचा पाया असलेल्या महापुरुषांचे ‘वैचारिक खच्चीकरण’ करण्याचा एक सुनियोजित कट आहे, ज्यामुळे हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावर तात्काळ बंदी घाला आणि संबंधित घटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन झाल्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यावर शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी योग्य ती कार्यवाही करू असे सांगितले.
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, भाजपचे श्री. महेश जाधव, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, आरोग्य भारतीच्या वैद्या अश्विनी माळकर, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या वेळी महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, हिंदु महासभेचे उपाध्यक्ष श्री. विकास जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव आणि श्री. प्रसाद कुलकर्णी, हिंदु महासभा महिला आघाडीच्या शीलाताई माने, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. महेश चौगुले, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे, हिंदुत्वनिष्ठ श्री. सुहास चव्हाण, श्री. शशी बीडकर, विश्व हिंदु परिषदेचे श्री. मनोहर चौनानी, ‘नमो नमो’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम जरग यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोघलांच्या पाच पातशाह्या बुडवल्या आणि आक्रमक मुघलांना यमसदनाला पाठवले. अनेक ठिकाणी मंदिरे आणि अन्नछत्र उभारली. ते हिंदूंचे राजे झाले. असे असतांना ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाद्वारे त्यांची पूर्णत: चुकीची प्रतिमा निर्माण केली गेली आहे. तरी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या विक्रीवर आणि वितरणावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘एकेरी उल्लेख’ न हटवणार्या प्रकाशक आणि संबंधित संस्थांवर भारतीय न्याय संहिता कलम २९९ - धार्मिक भावना दुखावणे आणि महापुरुषांचा अपमान करणे, तसेच कलम १९६ विविध गटांमध्ये तेढ निर्माण करून सामाजिक शांतता भंग करणे या कलमान्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, महाराष्ट्र शासनाने इतिहासतज्ज्ञांची एक उच्चस्तरीय समिती नेमून या पुस्तकातील प्रत्येक आक्षेपार्ह विधानाचा आणि ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करण्यात यावा, केवळ छापील पुस्तकेच नव्हे, तर ‘अॅमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’ यांसारख्या ई-कॉमर्स साईट्स आणि अन्य वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या या पुस्तकाच्या डिजिटल प्रती आणि पीडीएफ लिंक्स सायबर कायद्यांतर्गत ब्लॉक करण्यात याव्यात, अशाही मागण्या या प्रसंगी करण्यात आल्या.

Comments
Post a Comment