महामार्ग कामांचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढावा

 

महामार्ग कामांचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढावा



बास्केट ब्रिजसह उड्डाण पूल व रस्ते रूंदीकरण कामे वेळेत आणि दर्जेदार पूर्ण करण्याच्या सूचना

कोल्हापूर १० सिटी न्यूज नेटवर्क 

 महामार्गाशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचा आज खासदार धनंजय महाडिक यांनी सविस्तर आढावा घेतला. मंजूर झालेली सर्व कामे ठरलेल्या वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाली पाहिजेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीत पंचगंगा नदीवरील प्रस्तावित बास्केट ब्रिज, शिरोली ते उचगावदरम्यानचा पिलरवरील पूल, तसेच सातारा ते कागल महामार्गाच्या सहा पदरीकरणासह विविध कामांचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, गोविंद प्रसाद तसेच महापालिकेचे उपअभियंता सुरेश पाटील यांची उपस्थिती होती.



सातारा ते कागल महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सध्या संथ गतीने सुरू असल्याची नोंद घेत खासदार महाडिक यांनी ते गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. पंचगंगा नदीवरील बास्केट ब्रिजचे काम पुढील अडीच वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित असून, यामुळे कोल्हापुरात प्रवेश अधिक सुकर व आकर्षक होणार आहे.

शिरोली ते उचगाव तसेच कागलजवळील लक्ष्मी टेकडी परिसरातील उड्डाण पूल प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या शहरातील उड्डाण पुलाच्या आराखड्याबाबत व तांत्रिक सल्लागारांच्या नियुक्तीबाबतही खासदारांनी सविस्तर माहिती घेतली.

रत्नागिरी ते सोलापूर या महामार्गावरील कामाची प्रगती, चोकाक ते रत्नागिरी रस्त्याची स्थिती, शिवाजी पूल ते केर्ले फाटा तसेच पेठनाका ते कागल दरम्यानच्या रस्त्यांच्या रूंदीकरणाच्या कामांचा आढावाही घेण्यात आला. सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी आवश्यक त्या सूचना खासदार महाडिक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

याशिवाय, जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांमध्ये येणाऱ्या अडचणी व गरजांबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.

Comments