बडोद्यातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनुरकर व शर्वरी कबनुरकर यांचे दमदार यश
कोल्हापूर, दि. २५ (सिटी न्यूज नेटवर्क) :
गुजरातमधील बडोदा येथे २० ते २४ एप्रिल दरम्यान शक्ती चषक ध्रुवीक चेस अकादमीतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय फिडे क्लासिक रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनुरकर आणि शर्वरी कबनुरकर यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
ऋषिकेश कबनुरकर याने ९व्या फेरीत प्रतीक अबीवर विजय मिळवत एकूण ७ गुणांची कमाई केली. त्याने बिलो १८०० रेटिंग गटात प्रथम क्रमांक पटकावत १०,००० रुपये रोख पारितोषिक व चषक मिळवला. तसेच त्याने २५ फिडे रेटिंग गुणांची भर घातली.
या स्पर्धेत ७ ग्रँडमास्टरसह २३९ मानांकित खेळाडू आणि एकूण ३६४ स्पर्धक सहभागी झाले होते. तीन गटांमध्ये मिळून एकूण ११ लाख रुपयांची पारितोषिके आणि २५० चषक देण्यात आले.
स्पर्धेचे अजिंक्यपद गुजरातच्या आनंद कर्तृव्याने ८.५ गुणांसह पटकावले. त्याला ६०,००० रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान, शर्वरी कबनुरकर हिने कॅनडाच्या खेळाडूसोबत सामना बरोबरीत सोडवत ५.५ गुणांसह ३४ फिडे गुणांची कमाई केली. तिने महिला गटात प्रथम क्रमांक मिळवत ३,००० रुपये आणि चषक पटकावला. शर्वरी ही केआयटी कॉलेजची विद्यार्थीनी आहे.
ऋषिकेश आणि शर्वरी हे दोघे अनुज अकॅडमी, दाभोळकर कॉर्नर, ताराबाई पार्क येथे सराव करतात. ऋषिकेश हा स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.
या यशासाठी त्यांना कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, सीईओ कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे तसेच कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे माजी सचिव कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments
Post a Comment