फुलेवाडी रोडवर स्वच्छता मोहीम; पावसाळ्यापूर्वी व्यापक उपक्रम
कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क
प्रभाग क्रमांक ९ मधील फुलेवाडी रोड परिसरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे आयोजन नगरसेविका माधवी मानसिंग पाटील तसेच मानसिंग पाटील युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले.
या उपक्रमात स्थानिक नागरिक, महिला व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रस्ते, नाले व परिसरातील कचरा साफ केला. महिलांनी झाडू, घमेल्यांच्या साहाय्याने रस्त्यावर साचलेली माती व कचरा हटवून स्वच्छतेत पुढाकार घेतला. नाल्यांमधील गाळ काढून पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या.
यावेळी नगरसेविका माधवी पाटील यांनी सांगितले की, पावसाळ्यात होणारे पाणी साचणे तसेच डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका टाळण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली आहे. नागरिकांनी स्वच्छतेबाबत जागरूक राहून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, मानसिंग पाटील युवा मंचचे मानसिंग पाटील म्हणाले की, भाजपच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त ही व्यापक स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद द्यावा. तसेच या भागात ‘क्रीडाई कोल्हापूर’ यांच्या माध्यमातून एका आयलँडचे कामही करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या मोहिमेमुळे परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती होऊन नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.




Comments
Post a Comment