रिलायन्स रिटेलकडून प्रियंका चोप्राच्या ‘एनोमली’ ब्रँडचे अधिग्रहण

 रिलायन्स रिटेलकडून प्रियंका चोप्राच्या ‘एनोमली’ ब्रँडचे अधिग्रहण



• रिटेल नेटवर्क आणि ‘टीरा’च्या माध्यमातून होणार विस्तार

मुंबई ३० सिटी न्यूज नेटवर्क 

रिलायन्स रिटेल लिमिटेडने प्रियांका चोप्रा जोनास  यांच्या हेअरकेअर ब्रँड ‘Anomaly’ (एनोमली) चे अधिग्रहण केले आहे. या व्यवहारात ब्रँडचे ट्रेडमार्क, ब्रँडशी संबंधित मालमत्ता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. या अधिग्रहणामुळे रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या ब्युटी व्यवसायाला अधिक बळकटी मिळणार आहे.


एनोमली ब्रँडची स्थापना 2021 मध्ये झाली होती. स्वच्छ (क्लीन), व्हेगन आणि उच्च दर्जाचे हेअरकेअर उत्पादनांसाठी ओळखला जाणारा हा ब्रँड परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे. सध्या हा ब्रँड अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विकला जात आहे.


या अधिग्रहणानंतर रिलायन्स रिटेल लिमिटेडकडे या ब्रँडचे संपूर्ण हक्क असतील. कंपनी आपल्या व्यापक रिटेल नेटवर्क आणि ‘टीरा’सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एनोमलीचा विस्तार वेगाने करणार आहे. ब्युटी आणि पर्सनल केअर क्षेत्रात आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्याचा कंपनीचा उद्देश आहे.


इशा अंबानी , एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड यांनी या व्यवहाराबाबत सांगितले, “एनोमलीला आमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करणे हे नव्या पिढीतील ब्युटी ब्रँड्सच्या विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. एनोमलीची मजबूत जागतिक ओळख, क्लीन फॉर्म्युलेशन आणि परवडणारी किंमत यामुळे तो विशेष ठरतो. आम्हाला विश्वास आहे की प्रियंकासोबतच्या सहकार्यामुळे भारतात या ब्रँडचा जलद विस्तार होईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याची वाढ अधिक बळकट होईल.”


रिलायन्स रिटेल लिमिटेड आता भारतावर अधिक लक्ष केंद्रित करत एनोमलीची पोहोच वाढवणार आहे. भारतीय केस आणि स्काल्पच्या गरजांनुसार नवीन उत्पादने विकसित केली जातील. तसेच हा ब्रँड अमेरिका, युनायटेड किंगडम आणि मध्यपूर्वेतील बाजारपेठांमध्येही विस्तारला जाईल.


प्रियांका चोप्रा जोनास या ब्रँडमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत राहतील आणि नवीन उत्पादने व कल्पनांवर काम करत राहतील. त्या म्हणाल्या, “एनोमलीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. वैयक्तिक प्रवास म्हणून सुरू झालेला हा ब्रँड आता उद्देशपूर्ण आणि जागतिक महत्त्वाकांक्षा असलेला ब्रँड बनला आहे. रिलायन्स रिटेलकडून झालेले हे अधिग्रहण एका नव्या आणि उत्साहवर्धक अध्यायाची सुरुवात आहे. त्यांच्या व्यापक नेटवर्क आणि रिटेल अनुभवामुळे आम्हाला भारतासह जगभरातील अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल. विशेषतः इशा अंबानी यांच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून मी ब्रँडच्या विकासात सक्रियपणे सहभागी राहीन.”


रिलायन्स रिटेल लिमिटेड सध्या वेगाने वाढणाऱ्या नव्या ब्युटी ब्रँड्सवर लक्ष केंद्रित करत आहे. आपल्या अनुभव, व्यापक नेटवर्क आणि ऑनलाइन-ऑफलाइन दोन्ही माध्यमांच्या साहाय्याने कंपनी एनोमलीचा भारतासह जागतिक स्तरावर विस्तार करणार आहे.

Comments