महाराष्ट्र डॉजबॉल संघाने राष्ट्रीय विजेतेपदासाठी झुंज द्यावी – अरुण जाधव यांचे आवाहन


महाराष्ट्र डॉजबॉल संघाने राष्ट्रीय विजेतेपदासाठी झुंज द्यावी – अरुण जाधव यांचे आवाहन

तूरंबे येथे राष्ट्रीय डॉजबाल सराव शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलताना जि.प .सदस्य अरुण जाधव,शेजारी सुधाकर जमादार,हेमंत वारके,दयानंद कांबळे,दत्तात्रय चौगले,कृष्णात गुरव,वैभव माने


तुरंबे (ता. राधानगरी)  २४ एप्रिल (सिटी न्यूज नेटवर्क):


राधानगरी तालुक्यातील तुरंबे गाव कुस्तीपंढरी म्हणून ओळखले जाते. या गावातील मल्लांनी प्रतिकूल परिस्थितीत राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादन करत लौकिक मिळवला आहे. याच परंपरेला पुढे नेत, बेळगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजेतेपदासाठी ताकदीने लढावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव यांनी केले.



बेळगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय डॉजबॉल चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्र राज्य संघातील मुला-मुलींच्या खेळाडूंचे चार दिवसीय प्रशिक्षण शिबिर तुरंबे येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या सदिच्छा समारंभात अरुण जाधव बोलत होते. तामिळनाडू येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत वारके विद्यालयाच्या खेळाडूंनी मिळवलेल्या यशाचा त्यांनी गौरव करत, तोच लौकिक कायम राखण्याचे आवाहन केले.



शिवछत्रपती पुरस्कार विजेते व महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनचे महासचिव प्रा. हनुमंत लुंगे यांनी संघाची निवड केली असून, या शिबिराचे आयोजन श्री मारुतीराव विष्णू वारके (आबाजी) विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, तुरंबे येथे करण्यात आले होते. वारके विद्यालय व महाराष्ट्र डॉजबॉल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे सराव शिबिर पार पडले.

कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष हेमंत वारके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तालुका क्रीडाधिकारी सुधाकर जमादार, मुख्याध्यापक एस. के. पाटील, सरपंच दयानंद कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. दत्तात्रय चौगले, कृष्णात गुरव, वैभव माने यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व्ही. जे. साबळे यांनी केले.

यावेळी अरुण जाधव, प्रशिक्षक संस्कार हारगुळे (कोल्हापूर), निशांत गायकवाड (ठाणे), स्विकार हारगुळे, प्रसाद दुमाले, वेदिका आबदार, वेदिका पाटील, हर्षवर्धन भोईटे तसेच निवड झालेल्या संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. आभार आर. बी. कांबळे यांनी मानले.

Comments