न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या आराध्य गिरिगोसावीची राष्ट्रीय रायफल नेमबाजी शिबिरासाठी निवड
कोल्हापूर बटालियनमधून एकमेव कॅडेट; महाराष्ट्र संघात मानाचे स्थान
कोल्हापूर, ३१ सिटी न्यूज नेटवर्क
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), कोल्हापूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचा एनसीसी कॅडेट आराध्य अजित गिरिगोसावी याची राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या नेमबाजी शिबिरासाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) आयोजित ‘ऑल इंडिया जी. व्ही. मावलणकर शूटिंग चॅम्पियनशिप’ या देशातील सर्वात मोठ्या आणि मानाच्या प्रि-नॅशनल नेमबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात त्याला स्थान मिळाले आहे.
महाराष्ट्रातून निवडलेल्या ४० कॅडेट्समध्ये आराध्यने आपले स्थान निश्चित केले असून, ही कामगिरी एनआयटी महाविद्यालयासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. विशेष म्हणजे, कोल्हापूर बटालियनमधून निवड झालेला तो एकमेव कॅडेट आहे.
आराध्यने एनसीसीच्या तिसऱ्या शिबिरानंतर कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश संपादन केले. फर्स्ट रिलीफमध्ये प्रथम क्रमांक पटकावत त्याने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकडे वाटचाल केली. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे आता त्याची पुढील टप्प्यातील महत्त्वाच्या ‘कॅट-१’ शिबिरासाठी निवड झाली आहे.
कॅट-१, कॅट-२ आणि कॅट-३ ही खडतर व तांत्रिक शिबिरे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आराध्यला राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वोत्तम १० कॅडेट्समध्ये स्थान मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्याच्या नेमबाजी कौशल्याला धार देण्यासाठी एनसीसी भवनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष प्रशिक्षण दिले आहे.
आराध्यच्या यशामागे न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. संजय एच. दाभोळे, विभागप्रमुख प्रा. डी. पी. जगताप, रजिस्ट्रार बी. बी. राजिगरे, तसेच एनसीसी केअरटेकर अधिकारी सौ. माधुरी पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांच्या प्रोत्साहनाचाही त्याला मोठा आधार मिळाला.
आराध्य गिरिगोसावीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालय प्रशासन, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन करत आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments
Post a Comment