कोल्हापूर एमआयडीसीत बांगलादेशी घुसखोरांचा शिरकाव?हिंदू एकता आंदोलनाचे पोलिसांना निवेदन

 कोल्हापूर एमआयडीसीत बांगलादेशी घुसखोरांचा शिरकाव?हिंदू एकता आंदोलनाचे पोलिसांना निवेदन



​शिरोली एमआयडीसी परिसरात वाढत्या संख्येकडे प्रशासनाचे वेधले लक्ष

​कोल्हापूर (शिरोली ) ३१ सिटी न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्यात इतर ठिकाणी बांगलादेशी नागरिकांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईमुळे, आता हे घुसखोर सुरक्षित निवारा शोधण्यासाठी कोल्हापूरकडे धाव घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, कोल्हापूरची सुरक्षा आणि सामाजिक सलोखा धोक्यात येऊ नये, यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ‘हिंदू एकता आंदोलन’, शिरोली (तालुका हातकणंगले) यांच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आज शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना अधिकृत निवेदन देण्यात आले.

​नेमका प्रकार काय?

दिनांक ३० मे २०२६ रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसने दररोज सुमारे २०० बांगलादेशी नागरिक कोल्हापुरात येत आहेत. मुंबई विभागीय रेल्वे प्रवासी संघटनेच्या निरीक्षणातून ही बाब उघड झाली असून, हे घुसखोर प्रामुख्याने कोल्हापूर एमआयडीसी परिसरात रोजगार शोधत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

​हिंदू एकता आंदोलनाच्या प्रमुख मागण्या:

​रेल्वेमार्गाने शहरात येत असलेल्या संशयित घुसखोरांची कसून तपासणी आणि शोधमोहीम राबवावी.

​बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैधपणे वास्तव्य करणाऱ्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी.

​या घुसखोरांना आश्रय देणाऱ्या आणि रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तींची व यंत्रणांची सखोल चौकशी करण्यात यावी.

​यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे तालुका प्रमुख प्रतीक डिसले यांनी सांगितले की, "शहराची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. बाहेरील घुसखोरांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन ठोस कारवाई करावी."

​यावेळी आंदोलनाचे तालुका प्रमुख प्रतीक डिसले यांच्यासह रोहन तानवडे, अनिकेत जाधव, यश यादव, करण पाटील, यश हांडे, ज्ञानेश देशमुख आणि आयुष जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments