"वनतारा" पुन्हा न्यायालयीन कसोटीत यशस्वी; सर्वोच्च न्यायालयाने नवी याचिका फेटाळली
• एसआयटी अहवालाचा फेरविचार करण्यास न्यायालयाचा नकार
• प्राण्यांचे स्थलांतर वैध आणि नियमांनुसार झाल्याचे मान्य
• प्रत्येक जीवाच्या संरक्षणाचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला – वनतारा
मुंबई ३० सिटी न्यूज नेटवर्क
वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धनाशी संबंधित प्रकरणात वनताराविरोधात दाखल करण्यात आलेली नवी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचिकेत पुन्हा उपस्थित करण्यात आलेले आरोप यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सखोलपणे तपासले असून त्यावर अंतिम निर्णयही देण्यात आला असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने म्हटले की, एसआयटीने तपास पूर्ण केलेल्या आणि न्यायालयाने आधीच निर्णय दिलेल्या प्रकरणांची वारंवार पुनर्तपासणी करता येणार नाही. त्यामुळे वनताराविरोधात चौकशी, जप्ती किंवा खटला दाखल करण्याच्या मागण्या न्यायालयाने फेटाळून लावल्या.
न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, संयुक्त अरब अमिराती (यूएई), व्हेनेझुएला, ब्राझील, झेक प्रजासत्ताक, दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमधून आणलेल्या प्राण्यांचे स्थलांतर वैध कागदपत्रे, सीआयटीईएस (CITES) परवाने आणि केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मंजुरीच्या आधारे करण्यात आले होते. न्यायालयाने या स्थलांतरांना व्यावसायिक नसून ‘प्राणिसंग्रहालय ते प्राणिसंग्रहालय’ (Zoo-to-Zoo) स्वरूपाचे मानले.
जामनगर येथील वनताराच्या कार्याचे महत्त्वही सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले. आदेशात नामशेष होण्याच्या धोक्यात असलेल्या मॅकॉ पक्ष्यांच्या संवर्धन आणि प्रजनन कार्यक्रमाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रियेद्वारे आणलेल्या आणि सुरक्षित वातावरणात योग्य काळजी घेतल्या जाणाऱ्या प्राण्यांना तेथून हलविणे त्यांच्या हिताचे ठरणार नाही, उलट ते क्रूरतेच्या स्वरूपात गणले जाऊ शकते, असे न्यायालयाने नमूद केले.
वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विवान करणी म्हणाले, “हा निर्णय आमचे कार्य योग्य दिशेने सुरू असल्याची पुष्टी करतो. वनतारामध्ये आलेला प्रत्येक प्राणी कायदेशीर प्रक्रियेनुसार आणण्यात आला आहे. त्याची अत्यंत संवेदनशीलतेने काळजी घेतली जाते आणि त्याला आयुष्यभर सुरक्षित आश्रय दिला जातो. आमच्यासाठी संवर्धन ही केवळ संकल्पना नसून दररोज पार पाडली जाणारी जबाबदारी आहे.”

Comments
Post a Comment