कोल्हापूर जिल्हा विद्युत समितीच्या अध्यक्षपदी खासदार धनंजय महाडिक यांची निवड
कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्हा विद्युत समितीच्या अध्यक्षपदी खासदार धनंजय महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. तर खासदार धैर्यशील माने आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
केंद्र शासनामार्फत महावितरणच्या माध्यमातून विविध वीजविषयक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी तसेच योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय विद्युत समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याची विद्युत समिती गठित करण्यात आली आहे.
सध्या केंद्र शासनाच्या सुधारित वीज वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस), पंतप्रधान ई-बस योजना आणि पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा आणि नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
समितीमध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, जिल्ह्यातील आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षा तसेच महावितरणचे अधीक्षक अभियंते यांचा समावेश करण्यात आला आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र शासनाच्या सर्व वीजविषयक योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील, असे सांगितले. तसेच योजनांच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने काम केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
खासदार महाडिक यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे केंद्र शासनाच्या विविध वीज योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Comments
Post a Comment