थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त कोल्हापूर अभियानाचा शुभारंभ; नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा – महापौर रूपाराणी निकम
थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त कोल्हापूर अभियानाचा शुभारंभ; नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा – महापौर रूपाराणी निकम
कोल्हापूर, ३१ सिटी न्यूज नेटवर्क
जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर महानगरपालिका आणि प्रसारमाध्यम न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने "थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त कोल्हापूर" या जनजागृती अभियानाचा शुभारंभ आज भवानी मंडप येथे करण्यात आला. या अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्रासमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहन महापौर सौ. रूपाराणी निकम यांनी केले.
कोल्हापूर हे धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर असून ते सामाजिक व आरोग्यदृष्ट्या अधिक स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तंबाखू सेवन आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या वाढत्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी या अभियानाद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना महापौर रूपाराणी निकम यांनी प्रसारमाध्यम न्यूज आणि महानगरपालिकेच्या या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच प्रसारमाध्यम न्यूजच्या आगामी सर्व सामाजिक आणि विधायक उपक्रमांना महानगरपालिकेचे सहकार्य कायम राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
प्रसारमाध्यम न्यूज चॅनेलचे संचालक प्रताप पाटील यांनी सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत प्रसारमाध्यमची भूमिका नेहमीच सक्रिय राहील, असे सांगितले. समाजहिताच्या विविध उपक्रमांद्वारे जनजागृती आणि सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू राहील, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी विद्यमान नगरसेवक आदिल फरास, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, नगरसेविका दीपा ठाणेकर, सृष्टी जाधव, दीपा काटकर, माधुरी व्हटकर, रेखा उगवे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, किरण नकाते, कसबा बावड्याचे नगरसेवक जाधव, जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालयाच्या दीपा शिपूरकर व विजय घोडखिंडकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील पाच्छापुरे, ई-सिटी न्यूज नेटवर्कचे संपादक सागर ठाणेकर यांच्यासह आरोग्य, शिक्षण, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, महालक्ष्मी भक्त मंडळाचे राजू मेवेकरी, आदर्श प्रशालेचे मुख्याध्यापक आर. व्ही. पाटील, स्वामी विवेकानंद ट्रस्टचे महेश कामत आणि किशोर घाटगे यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत भविष्यात या थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त अभियानात सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे सांगितले.
या अभियानाच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


Comments
Post a Comment