सरगम म्युझिकल समूहाचा 100 गीतांच्या मॅरेथॉन गायनाचा विश्वविक्रमी उपक्रम 27 जूनला

 

सरगम म्युझिकल समूहाचा 100 गीतांच्या मॅरेथॉन गायनाचा विश्वविक्रमी उपक्रम 27 जूनला




कोल्हापूर २३ सिटी न्यूज नेटवर्क 

सरगम म्युझिकल ग्रुप (एस.ए.) यांच्या वतीने ज्येष्ठ संगीतकार यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये सलग 100 हून अधिक गीतांच्या गायनाचा विक्रमी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन (केएमए) सभागृहात सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत हा संगीतमय मॅरेथॉन कार्यक्रम होणार आहे.

या उपक्रमात महाराष्ट्रभरातून एकत्र आलेले 87 हौशी गायक-कलाकार सहभागी होणार असून, आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली 100 पेक्षा अधिक गीते सादर केली जाणार आहेत. हा कार्यक्रम आशियाई स्तरावरील विक्रम नोंदविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला असून, यामुळे कोल्हापूरचे नाव एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झळकण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी गेल्या चार महिन्यांपासून कलाकारांचा सराव आणि तयारी सुरू आहे.

संगीताला समर्पित असलेला हा सरगम म्युझिकल ग्रुपचा पाचवा विश्वविक्रमी उपक्रम आहे. कार्यक्रमास कोल्हापूरच्या महापौर सौ. रूपाराणी निकम, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ए. बी. पाटील, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय सांस्कृतिक समिती (आयएमए) शाखेचे अध्यक्ष डॉ. राजेश इंगोले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच डॉ. अर्जुन अडनाईक, डॉ. डी. ए. पाटील, अरविंद कस्तुरे, सुरभी अकॅडमीचे प्रमुख तसेच माजी महापौर शिवाजीराव कवाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. एशियन वर्ल्ड रेकॉर्डचे निरीक्षकही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर सहभागी सर्व कलाकारांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. याच वेळी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत यश मिळविलेल्या बाल चमूचा तसेच स्टार प्रवाहवरील ‘छोटा उस्ताद’ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या बालकलाकार शुभ्रा खाडे हिचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

कोल्हापूर मेडिकल असोसिएशन हॉल, पद्मावती मंदिराजवळ, बेलबाग येथे होणाऱ्या या कार्यक्रमास संगीतप्रेमी व रसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. आशा शितोळे, डॉ. अनिता परीतेकर, डॉ. अनिल कवठेकर, डॉ. स्मिताराणी मोरे, के. टी. शिंदे, राजकुमार पारकर, चित्रा कवाळे, चिन्मय पारकर आणि स्मिता गिरी हे परिश्रम घेत आहेत. या विक्रमामुळे कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Comments