व्हायरल व्हिडिओ एडिटेड; सतेज पाटलांनी आत्मपरीक्षण करावे, बदनामीचे राजकारण थांबवावे – आमदार राजेश क्षीरसागर



व्हायरल व्हिडिओ एडिटेड; सतेज पाटलांनी आत्मपरीक्षण करावे, बदनामीचे राजकारण थांबवावे – आमदार राजेश क्षीरसागर



कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क 


व्हायरल झालेला कथित व्हिडिओ पूर्णपणे एडिट करून व्हॉईस डबिंगद्वारे तयार करण्यात आला असून, योग्य वेळी सर्व कायदेशीर पुरावे जनतेसमोर मांडणार असल्याचा दावा करत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार राजकीय हल्लाबोल केला. स्वतःच्या निष्क्रियतेवर पडदा टाकण्यासाठी आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सतेज पाटील बदनामीचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.


क्षीरसागर म्हणाले की, सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेला कथित व्हिडिओ हा पूर्णपणे एडिटेड आणि व्हॉईस डबिंग करून तयार करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीने स्वतः भेट घेऊन या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे लेखी दिले असून, या संदर्भातील सर्व कायदेशीर पुरावे आपल्या ताब्यात आहेत. योग्य वेळ आल्यावर ते जनतेसमोर सादर केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.


महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हा व्हिडिओ मुद्दाम व्हायरल करण्यात आला होता. त्यावेळी सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर त्या चौकशीचा पाठपुरावा का केला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


"मी पाठीत वार करणारा माणूस नाही. मात्र, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्याची सवय सतेज पाटलांनी सोडावी. काचेच्या महालात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत. अनेकांच्या वैयक्तिक आणि राजकीय कुंडल्या माझ्याकडे तयार आहेत. पण मी कधीही वैयक्तिक पातळीवर राजकारण केले नाही," असा इशाराही त्यांनी दिला.


यावेळी त्यांनी आपल्या विकासकामांचाही उल्लेख केला. सर्किट बेंच, आयटी पार्क, कन्व्हेन्शन सेंटर, अंबाबाई मंदिर विकास आराखडा, रंकाळा संवर्धन, ३२०० कोटी रुपयांचा पूरनियंत्रण प्रकल्प, केशवराव भोसले नाट्यगृहासाठी २५ कोटी रुपयांचा निधी, तसेच हद्दवाढ, ओव्हरब्रिज, भुयारी मार्ग आणि अद्ययावत पार्किंग व्यवस्था यांसारख्या प्रकल्पांचा उल्लेख करत, "माझ्या विकासकामांमुळेच सतेज पाटील यांच्या पोटात पोटशूळ उठला आहे," असा टोला त्यांनी लगावला.


विधानसभा निवडणुकीसह महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये जनतेने काँग्रेसला नाकारून महायुतीला कौल दिला असून, आगामी काळात गोकुळ दूध संघावरही महायुतीची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


सोशल मीडियावर खोटे आणि एडिटेड व्हिडिओ वेगाने व्हायरल होतात; मात्र सत्य मांडणाऱ्या व्हिडिओंना प्रसिद्धी मिळत नाही, ही दुर्दैवी बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. आपण कायम जनतेच्या सुख-दुःखात सहभागी राहिलो असून, सतेज पाटील यांनी आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.


या पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी प्रदेश सचिव महेश जाधव, उपमहापौर अक्षय जरग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते आदिल फरास, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका शिला सोनुले, नगरसेविका अनुराधा खेडकर, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक अजय इंगवले, विनायक साळोखे, शिवसेना शहरप्रमुख रणजित जाधव, तुकाराम साळोखे, सुनील जाधव, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Comments